राहुल गांधीनी केला संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान !
- आशिष देशमुख यांचा आरोप
- भाजपा राज्यभर आंदोलन करणार
- ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न
नागपूर : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा जन्म ओबीसीत झाला नसून गुजरात मधील तेली जातीत झालेला आहे, असा तिरपागडा आरोप करून संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केला असल्याने भाजपाने त्यांच्याविरुद्ध कंबर कसली असून शुक्रवारी राज्यभर निषेध आंदोलन घोषित केले.भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने नागपूर येथे संविधान चौकात तसेच प्रत्येक जिल्हा व तालुका केंद्रावर शुक्रवार, ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.०० वा निषेध आंदोलन करणार असल्याची घोषणा भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश प्रभारी डॉ. आशिष देशमुख यांनी केली. या आंदोलनात भारतीय जनता पार्टी, ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा जन्म ओबीसीत झाला नसून गुजरात मधील तेली जातीत झालेला आहे, गुजरातमध्ये सन २००० मध्ये ओबीसीत आणली असून मोदी यांचा जन्म सामान्य जातीत झाला. त्यांनी जातीनिहाय जनगणनेला (कास्ट सेन्सस) विरोध केला कारण त्यांचा जन्म ओबीसीत झालेला नसून सामान्य जातीत झालेला आहे असे बेताल व निर्ल्लज उदगार कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ओरिसातील सभेत काढले असून, राहुल यांचा हा उद्दामपणा म्हणजे समस्त ओबीसी समजाचा अपमान आहे, असा आरोप आशिष देशमुख यांनी केला.
नागपूर येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, राहुल गांधी हे गांधी कुटुंबात जन्माला आले असून त्यांचा इटालियन कुटुंबाशी संबंध आहे. या लॉजिक प्रमाणे ते स्वत: भारतीय नागरिक ठरू शकत नाही. काँग्रेस नेहमीच ओबीसी आरक्षण विरोधात राहिली आहे. पंडीत नेहरू यांनी सन १९५३-५४ मध्ये काकासाहेब कालेलकर आयोगाने केलेल्या शिरफारशींचा विरोध केला होता. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी मंडल आयोगाला विरोध केलेला आहे. इंदिरा गांधीनी मंडल आयोग रद्दीत टाकला होता.
डॉ. देशमुख म्हणाले की, राहुल गांधीच्या मते ओबीसी अंतर्गत अनेक जाती आरक्षणास पात्र नाहीत; कारण त्या सर्व पूर्वी सामान्य वर्गात होत्या. पुन्हा एकदा गांधी परिवार ओबीसी विरोधात षडयंत्र रचत आहे. एखाद्या जातीची ओबीसी विभागणी होण्यापूर्वी ज्या व्यक्तीचा अशा जातींमध्ये जन्म झाला त्यांचे आरक्षण राहुल गांधी काढून घेण्याच्या तयारीत आहे. कॉंग्रेस तेली समाजाला ओबीसी पासून वेगळे करण्याचा आणि ओबीसींचा एक वर्ग कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. इतके वर्ष धर्म आणि जातीवरून फूट पडून ते आता ओबीसीमध्ये सुध्दा फूट पाडत आहेत, असा आरोप आशिष देशमुख यांनी केला.
अनेक राज्यात कॉंग्रेसने ओबीसीचे आरक्षण कमी करून मुस्लिमांना हे आरक्षण देण्याचे प्रकार केलेले आहे. ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा कॉंग्रेसने कधीही दिलेला नाही. युपीए -२ च्या सरकारमध्ये संपूर्ण कॅबिनेटमध्ये मंत्री म्हणून केवळ एकाच ओबीसी व्यक्तीला स्थान देण्यात आले होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसींना आरक्षण देता आले नाही. धनगरांच्या आणि गोवारी जमातीचा अनुसूचित जमाती आरक्षणाबद्दल कॉंग्रेसनेच घोळ निर्माण करून ठेवला आहे, असेही ते म्हणाले.
पत्रकार परिषदेला ओबीसी मोर्चा अध्यक्ष संजय गाते, आ. कृष्णा खोपडे, भाजपा नागपूर शहराध्यक्ष बंटी कुकडे, नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, अर्चना डेहनकर, प्रशांत पाटील, रवींद्र चव्हाण, डी. डी. सोनटक्के, कमलाकर घाटोळे, नितीन गुडधे (पाटील), रवींद्र येनुरकर, शालिक नेवारे, विजय वासेकर श्रावण फरकाडे, सुनील हिरणवार, दिलीप ठाकरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.