जळगाव – दुचाकीवरुन ट्रीपलसीट जाणार्या तरूणांना थांबवून दंड भरण्याच्या सुचना केल्याचा राग आल्याने दुचाकीवरील तिघा तरुणांनी महिला वाहतुक पोलीस तसेच ट्रॅफिक वॉर्डन या दोघांशी हुज्जत घालून ई-चलन डिव्हाईस मशीन हिसकावून घेतल्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी दुपारी पुष्पलता बेंडाळे चौक परिसरात घडला. या प्रकारानंतर तिघा तरुणांना वाहतूक शाखेत आणले असता, याठिकाणी दुचाकीस्वार तरुणाकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याची बाब समोर आली. यानंतर मोहन बडगुजर रा. पांझरापोळ टाकीजवळ मनोज सुधाकर चौधरी रा. विठ्ठलपेठ तेली गल्ली या दोघांविरोधात महिला पोलीस कर्मचार्याच्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर वाहतूक शाखेत कार्यरत सुनिता पाटील ह्या गुरुवारी ट्रॅफिक वार्डन उमेश ठाकूर यांच्यासोबत बेंडाळे चौक येथे कार्यरत होत्या. यादरम्यान दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास दुचाकी ( क्र. एम.एच. 19 डी.ई. 4445) ही चौकातून जात होती. दुचाकीवर तीन जण बसलेले असल्याने कारवाईसाठी सुनिता पाटील यांनी दुचाकी थांबवून दुचाकीस्वार मोहन बडगुजर दंड भरण्याच्या सुचना केल्या.
तुम्ही आमचे काहीही करुन शकत नाही….
दुचाकी थांबविल्यानंतर दुचाकीस्वार बडगुजर यास लायसन्स बददल विचारणा केली असता, व ट्रीपलसीट का जात आहेत, याबाबत विचारणा केली असता, त्याचा राग येवून बडगुजरसह त्याच्या सोबतच्या तरुणाने आरडाओरड करत हुज्जत घालून गर्दी गोळा केली. कर्मचाारी सुनीता पाटील यांनी ई चलन डिव्हाईस मशीन व्दारे त्यांचा गाडीचा फोटो घेण्याचा प्रयत्न केला मोहन बडगुजर याने सदर डिव्हाईस मशीन जबरीने हिसकावुन त्याच्या खिशात घातले. त्याच्या सोबतच्या मनोज याने आरडाओरड करून आम्ही कोणत्याही प्रकारे दंड भरणार नाही, तुम्ही आमचे काही करुन शकत नाही या शब्दात तरुणांनी वाहतूक पोलीस कर्मचार्यासह वार्डनला सुनावले.