माता आणि बालमृत्यू कमी करण्यासाठी गर्भधारणेपूर्वीपासून ते शिशु दोन वर्षांचे होईपर्यंतचा कालावधी हा अत्यंत महत्त्वाचा आहे. माता व बालकांची गर्भधारणेपूर्वीपासून महिलांच्या आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी गर्भधारणापूर्व, प्रसूतीपूर्व, प्रसूतीदरम्यान आणि प्रसूतीनंतर माता व बालसंगोपनाच्या विविध योजनांच्या कार्यक्रमांचे एकत्रिकरण करुन राज्यात ‘वात्सल्य’ कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वी नाशिक जिल्ह्यातील दोन तालुक्यात ‘वात्सल्य’ कार्यक्रम प्रायोगिक स्वरुपात राबविण्यात आला होता. त्याच्या सकारात्मक परिणामांमुळे आता हा कार्यक्रम संपूर्ण राज्यभरात राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग हा इतर सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधून कार्यक्रमाची अंमलबजावणी करणार आहे.
वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाची वैशिष्ट्यपूर्ण उद्दिष्ट्ये
कमी दिवसांचे आणि कमी वजनी बालकांच्या जन्माचे प्रमाण कमी करणे, जन्मतः विकृतीचे प्रमाण कमी करणे, उपजत मृत्यू प्रमाण कमी करणे. निरोगी गर्भधारणा आणि प्रसूतीसाठी माता आरोग्यात सुधारणा करणे, गर्भधारणेपूर्वीच मातेच्या आरोग्याची जोखीम ओळखणे व पाठपुरावा करणे, बालकाच्या हजार दिवसाच्या वाढीची सातत्यपूर्ण देखरेख करणे ही या कार्यक्रमाची उद्दिष्ट्ये निश्चित करण्यात आली आहेत.
कुटुंब नियोजन साधन न वापरणारी असंरक्षित जननक्षम योग्य जोडपी, प्रसूतीपूर्व कालावधीतील माता आणि गरोदर महिलांच्या सहवासात सोबत करणारी व्यक्ती, दोन वर्षाखालील शिशू या कार्यक्रमाचे अपेक्षित लाभार्थी आहेत.
गर्भधारणापूर्व आरोग्य तपासणी
या कार्यक्रमात प्राधान्याने गर्भधारणापूर्व आरोग्य तपासणी केली जाणार आहे. माता व बालकांना आरोग्यासाठी असलेली जोखीम विविध टप्प्यात ओळखणे व आवश्यक सेवेद्वारे जोखीमीचे प्रभावी व्यवस्थापन, बालकांच्या वजन वाढीचे आलेखाद्वारे संनियंत्रण केले जाणार आहे. गर्भधारणापूर्व कालावधीमध्ये निदानात्मक चाचण्या आणि प्रजनन मार्गात जंतुसंसर्ग व एच. आय. व्ही. होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपचार करण्यात येणार आहेत.
आय.एफ.ए., फॉलिक ॲसिड, मल्टिमायक्रोन्यूट्रिएन्ट्स, ‘ड’ जीवनसत्व, लसीकरण तसेच अन्य उपचारही देण्यात येणार आहेत. रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग आदी रक्तासंबंधी गुंतागुंत आजारांचे, अतिजोखिमेच्या मातांचे लवकर निदान, उपचार व व्यवस्थापन करण्यात येणार आहे. प्रसुतीपूर्व, प्रसुतीदरम्यान आणि प्रसुतीपश्चात सेवांमध्येही अतिजोखमीच्या मातांचे मूल्यमापन करुन त्यांच्या सर्व संबंधित चाचण्या, उपचार आणि समुपदेशन करण्यात येणार आहे. रक्तक्षयाला प्रतिबंध व्हावा यादृष्टीने विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.
बाळाच्या 1 हजार दिवसापर्यंतच्या वाढीचे मूल्यमापन करताना वेळोवेळी एएनएम कार्यकर्ती भेटी देणार असून बाळाच्या मातेला लोहयुक्त गोळ्या, कॅल्शियम आणि ‘ड’ जीवनसत्व आदी उपचार, तपासणी आणि संदर्भित सेवा देणार आहेत. बालकांचे नियमित लसीकरण, कांगारू मदर केअर, स्तनपानाचे महत्व, पूरक आहार, वजन व वाढीचे मूल्यमापन करतानाच आवश्यक जीवनसत्त्व औषधांचे वाटप करणार आहेत.
वात्सल्य कार्यक्रमात समुपदेशन आणि माता व बालकाचा वाढ व विकासावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. जन्मतः तात्काळ स्तनपान, जन्म ते सहा महिन्यापर्यंत निव्वळ स्तनपान आणि योग्य पुरक आहार तसेच बालकांच्या वजन वाढीचे सनियंत्रण केले जाणार आहे.
माता आणि बालकांच्या आरोग्याच्या सुविधांचे बळकटीकरण करण्यासाठी आरोग्य विषयक विविध कार्यक्रमांचा समन्वय करण्यासोबत विविध शासकीय विभागांचे सहभाग घेण्यात येणार आहे. गृहभेटीद्वारे गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेवर भर देण्यात येईल.
या कार्यक्रमामुळे राज्यातील सर्व घटकातील महिला तसेच बालकांचा योग्य शारीरिक, मानसिक, सामाजिक विकास होणार आहे. शिवाय सदृढ बालक जन्माला आल्यामुळे कुपोषणाची समस्या कमी होण्यासह बालकांची बौद्धीक क्षमता वृद्धींगत होण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून बालकांची निकोप आणि सर्वांगिण वाढ होऊन ते सर्वार्थाने सक्षम होऊ शकतील.
संकलन : उप माहिती कार्यालय, बारामती