जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत नेते आणि शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय गरुड यांनी राष्ट्रवादी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.मंगळवारी ३० जानेवारी रोजी ते मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार असून ते मुंबईला रवाना झाल्याची माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठविला असून पक्षांतर्गत विरोध व गटबाजीला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
मंत्री गिरीश महाजन यांचे जामनेर विधानसभा मतदार संघातील कट्टर राजकीय विरोधक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) संजयदादा गरुड देखील भाजपाच्या वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो आणि कुणी मित्र नसतो. याची प्रचिती जामनेर तालुक्यात येत्या काही दिवसात पाहायला मिळू शकते असे भाकीत वर्तवणारे वृत्त ‘नजरकैद’ ने २४ जानेवारी रोजी प्रसिद्ध केले होते. दरम्यान संजय गरुड यांनी राष्ट्रवादीचा दिलेला राजीनामा पाहता त्यांचा भाजप प्रवेश निश्चित असल्याचे मानले जातं आहे.
आयोध्यातील श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आयोजित एका शोभायात्रेच्या निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) संजयदादा गरुड व मंत्री गिरीश महाजन यांच्यात भेट झाल्याचं समजतं भेटीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते दोघांमधील चर्चा मात्र समजू शकली नव्हती. भाजपा प्रवेशा संदर्भात अद्याप संजय गरुड अथवा गिरीश महाजन यांनी जाहीर केलेले नाही. जामनेर तालुक्यातील मंत्री गिरीश महाजन यांचे राजकीय कट्टर विरोधक असलेले संजय गरुड भाजप मध्ये आल्यास भाजपाची ताकद वाढणार असून विरोधकच शिल्लक राहणारं नाही अशी परिस्थिती निर्माण होईल.
भाजपचे संकट मोचक मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघातून तीन वेळेस संजय गरुड यांनी अतिशय तगडे आव्हान उभे करत मंत्री गिरीश महाजन यांना लढत दिली होती.मंत्री महाजन यांचे विधानसभा मतदार संघातील तगडे प्रतिस्पर्धी व कट्टर विरोधक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. संजय गरुड यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यामुळे याचा जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम होणार आहे.आगामी लोकसभा निवडणूकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते असलेले संजय गरुड हे गिरीष महाजन यांच्या सोबत भाजपात आल्यास लोकसभेला समीकरण बदलण्याची शक्यता आहे.त्याच बरोबर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात, हेही तितकेच खरे आहेत.आगामी लोकसभा निवडणूकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते असलेले संजय गरुड भाजप प्रवेशा संदर्भात काय निर्णय घेता याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
नजरकैद ने दिनांक २४ रोजी प्रसिद्ध केलेली बातमी