मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी अलिबागमध्ये मनसेची जमीन परिषद आयोजित करण्यात आली आहे. यावेळी राज ठाकरेंनी भर सभेत कार्यकर्त्यांना झापलं. जमीन परिषद या नावावरुन त्यांनी कार्यकर्त्यांना खडेबोल सुनावले. मला केवळ पत्रकारांशी संवाद साधायचा होता पण आपण अजून किती भोळसट आहोत याचा नमुना आजच्या बैठकीत दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे म्हणाले की, “आपण अजून किती भोळसट आहोत याचा नमुना आजच्या बैठकीत दिसत आहे. त्या दिवशीच्या शिबिरात मी काय सांगितलं आणि आज कशा प्रकारची बैठक लावली. मला रायगड जिल्ह्यातील फक्त पत्रकारांशी संवाद साधायचा होता. परंतू, त्याला जमीन परिषद वगैरे नाव दिले गेले. या काही जाहीर करायच्या गोष्टी नव्हत्या.”
पुढे ते म्हणाले की, “बाकीचे लोकं आपल्या राज्यात कसे हुशारीने घुसतात आणि आपण किती बेसावधपणे आणि भोळसटपणे वागतो आहोत याचा आधी विचार करा. ही काही जाहीर सभा नाही. महाराष्ट्रावर होणाऱ्या आक्रमणाबद्दल मला चर्चा करायची होती. मी एकटा बोलतोय आणि तुम्ही ऐकताय हे मला अपेक्षित नव्हतं,” असेही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, रायगड प्रेस क्लब आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड भुमीच्या रक्षणासाठी अलिबागमध्ये जमीन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेतून राज ठाकरे रायगड जिल्ह्यातील पत्रकारांशी संवाद साधत आहेत.