नवी दिल्ली : येत्या २२ जानेवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अयोध्येतील राम मंदिरात होणारा प्राणप्रतिष्ठा सोहळा सध्या देशासह जगातील चर्चेचा विषय बनला आहे. प्रत्येकाला या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हायचे आहे. सर्वांना अयोध्येला जाण्याचे वेध लागले आहेत. दर्शनासाठी कोटीच्या संख्येने होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता नेमकी हीच संधी साधून चोरटे VIP दर्शनाच्या नावाखाली भक्तांची लुबाडणूक करण्याच्या तयारीत आहेत, अशावेळी भक्तांनी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.
यंदाचे २०२४ वर्ष महत्त्वपूर्ण आहे. आता रामराज्य येत आहे कारण श्रीरामलल्ला अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या गर्भगृहात विराजमान होणार आहेत. तिथे २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे. देशातील नागरिकांसाठी हा महत्त्वाचा क्षण आहे. देशात केवळ शांतता पर्व नव्हे तर रामराज्य येत आहे.
दरम्यान या सोहळ्यासाठी मंदिरात मोफत VIP व्हीआयपी प्रवेश पासच्या नावाखाली चोरटे लुबाडणूक करू शकतात. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याची गरज आहे. नागरिक एकमेकांना राम मंदिराविषयी विविध प्रकारचे फोटो, व्हिडीओ, मेसेजेस, गाणी आदी पाठवत आहेत. अशात तुम्हाला अनोळखी क्रमांकावरून निमंत्रणाचा मेसेज येऊ शकतो. मंदिरात मोफत व्हीआयपी प्रवेशाचे आमिष दाखवले जाऊ शकतो. या पोस्टद्वारे मालवेअर फोनमध्ये प्रवेश करू शकतात.
पास मिळवण्यासाठी राम जन्मभूमी गृहसंपर्क अभियान इन्स्टॉल करा, असे सांगितले जाते. या डाऊनलोडिंगमध्ये काही फाइल तुमच्या मोबाइलमध्ये प्रवेश करतात आणि पुढे मोठा अनर्थ होतो.यातील मालवेअरमुळे तुमची व्यक्तिगत डेटा चोरी, लॉगिनचा तपशील, पासवर्ड, क्रेडिट तसेच डेबिट कार्डचे नंबर, ब्राऊझिंग हिस्ट्रीचीही चोरी करू शकतात.बैंकिंग अॅप्स, बैंक अकाउंट नंबर चोरटे मिळवतात. ओटीपीही इंटरसेप्ट करू शकतात.चोरटे डिव्हाइस लोकेशन ट्रॅक होऊ शकते, फोन फ्रीज करु शकतात. सर्व डेटा डिलीट करु शकतात.
हा मेसेज केंद्र सरकार, राज्य सरकार, कार्यक्रम आयोजक किंवा मंदिर समितीकडून पाठवल्याचे भासवले जाते. प्रत्यक्षात हा मेसेज या संस्थांनी पाठवलेला नसतो, हे लक्षात घेतले पाहिजे. चोरांची ही चाल लक्षात घ्या.अशा संशयास्पद मेसेजवर क्लिक करू नका, असा मेसेज कुणाला फॉरवर्डही करू नका. याची माहिती तातडीने सायबर सेलकडे द्या.असे केल्याने तुमची फसवणूक होणार नाही.