जळगाव,(प्रतिनिधी): एरंडोलचे प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्यावर शुक्रवारी जीवघेणा हल्ला झाला होता.या घटनेने वाळू माफियांची दबंगिरी समोर आली आहे.प्रांत अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या ५ आरोपीची नावे निष्पन्न झाले आरोपींच्या शोधासाठी दोन पथके तयार करण्यात आल्याची माहिती भडगावचे पोलिस निरीक्षक राहुल पाटील यांनी दिली असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.
शुक्रवारी रात्री एरंडोलचे प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड हे महसूल पथकासह रात्री उत्राण येथील गिरणा नदीच्या पात्राजवळ गेले असता त्यांच्यावर वाळू माफियांनी हल्ला केला. त्यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. तसेच या महसूल पथकावर दगडफेक करण्यात आली होती. यातून प्रांतासह पथक बचावले होते. या घटनेतील पाच आरोपी निष्पन्न झाल्याचे पोलिस निरीक्षकांनी सांगितले. याबाबत दोन पथके तया करण्यात आली आहेत. यातील पथक एक पाचोरा व दुसरे कासोद्यातील आहे.
सध्या जिल्ह्यात वाळूचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. मागील दिवसांपूर्वी जळगावच्या तहसीलदारांच्या वाहनाला डंपरने उडविण्याचा प्रयत्न झाला होता. त्यापूर्वी वाळूच्या डंपर दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जणांना उडविले होते. त्यानंतर आता शासकीय अधिकार्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे.
जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रशासनाचा अकुंश न राहिल्याने त्यांच्याकडून अधिकाऱ्यांवर वाहन घालणे, वाहने पळवून नेण्याचे प्रकार जिल्ह्यात नित्याचेच झाले आहेत. गिरणा व तापी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा व चोरटी वाळू वाहतूक करण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत.