मुंबई- नागरिकत्व कायद्याविरोधात तरुणांचं आंदोलन चिरडून देशात पुन्हा ‘जालियनवाला बाग’ घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा घणाघात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर केला असतानाच, आता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तुलना जनरल डायरशी केली आहे. त्यामुळं आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
नागरिकत्व दुरुस्ती कायदा मंजूर झाल्यानंतर विरोधी पक्ष केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल, मोदी सरकारवर निशाणा साधला होता. दुसरीकडे, या कायद्याविरोधात देशभरातील विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. या कायद्यावरून विरोधक मोदी सरकारवर टीका करत असतानाच, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरच निशाणा साधला आहे. त्यांनी अमित शहा यांची तुलना जनरल डायर याच्याशी केली आहे. ‘अमित शहा हे जनरल डायरसारखेच देशातील जनतेवर गोळ्या झाडण्याचा आदेश देत आहेत. ज्या प्रकारे जालियानवाला बागेत जनरल डायरनं लोकांवर गोळीबार केला होता, त्याचप्रकारे अमित शहा हेही देशातील लोकांवर गोळ्या झाडण्याचे आदेश देत आहेत. अमित शहा हे जनरल डायरपेक्षा काही कमी नाहीत,’ असं मलिक म्हणाले.