धडगाव : मुला-मुलींचे वाढदिवस असले म्हणजे भव्यदिव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्याची जणू प्रथाच सुरू झाली आहे. मात्र, असे असले तरी आजच्या चंगळवादी दुनियेत सामाजिक भान जपणारी माणसेही आढळून येतात. निगदी येथील रणजित वळवी वा त्यांच्या पत्नी पं.स.सदस्या गुणिता वळवी यांनी जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून आपल्या सुकन्येचा वाढदिवस साजरा केला.
तालुक्यातील निगदी (वाहणीपाडा) येथील रणजित वळवी वा त्यांच्या पत्नी पं.स.सदस्या गुणिता वळवी नेहमीच लोकोपयोगी आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. नुकताच त्यांची कन्या प्रांजल हिचा वाढदिवस होता. आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त या दांपत्यांनी आपले सामाजिक उत्तरदायित्व म्हणून जि.प.शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. यात इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना उजळणीची पुस्तके, पेन आणि दुसरी, तिसरी, चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांना वह्या, पेन वाटप करण्यात आले. शिवाय सर्व विद्यार्थ्यांना केक, बिस्कीट, चॅाकलेट देण्यात आले. विशेषत या दांपत्याने आपल्या लेकीचा वाढदिवस अभिनव पद्धतीने साजरा करीत समाजापुढे त्यांनी आदर्श ठेवला आहे.
यावेळी शिवसेना युवा तालुका प्रमुख मुकेश वळवी, सायसिंग वळवी, बोख्या पवार, दारासिंग वळवी, आरकिताई वळवी, कुशाल पाडवी, शाळेतील शिक्षक आदी उपस्थित होते.