नवी दिल्ली : कर्नाटकातील एका हॉटेलमध्ये काही कट्टरपंथी तरुणांनी घुसून तिथे राहणाऱ्या एका महिलेला आणि पुरुषाला मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होतं आहे. याप्रकरणी आता एक नवा खुलासा समोर आला आहे. या घटनेतील पीडित महिलेने आरोप केला आहे की, हॉटेलच्या बाहेर आल्यावर कट्टरपंथींनी तिला निर्जनस्थळी नेले आणि तेथे तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये महिलेचे म्हणणे आहे की, हॉटेलमधून तिचे अपहरण केल्यानंतर या कट्टरपंथी तरुणांनी तिला बाईकवर बसवले आणि जंगलात नेले. तेथे तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार झाला. महिलेचे म्हणणे आहे की, यानंतर सातपैकी तीन आरोपी तरुणांनी तिला बस स्टँडवर कारमध्ये टाकले. हल्लेखोरांनी या महिलेला बसमध्ये बसून सिरसीला जाण्यास सांगितले होते. ही महिला त्या ठिकाणची रहिवासी आहे.
दरम्यान, हावेरीचे एसपी अंशु कुमार म्हणाले, “आम्हाला अत्याचाराबाबत यापूर्वी सांगण्यात आले नव्हते. या महिलेच्या व्हिडीओबाबत प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तातूनच आम्हाला याची माहिती मिळाली. आम्ही संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. तपास चालू आहे.” या प्रकरणातील आरोपी कोणत्याही संघटनेशी संबंधित नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, मात्र त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही असाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय होतं संपूर्ण प्रकरण?
हे प्रकरण कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील असून दि.७ जानेवारी २०२४ चे आहे. एक हिंदू तरुण आणि एक मुस्लिम महिला, उत्तरा कन्नड जिल्ह्यातील रहिवासी हॉटेलच्या खोलीत थांबले होते. याबाबत माहिती मिळताच अक्किलूर येथील काही कट्टरपंथींनी हॉटेल गाठले. तिथे व्हिडिओ बनवताना ते रूम नंबर रेकॉर्ड करतात. यानंतर हे लोक दोघांना खोली उघडण्यास सांगत धमकावतात.
जेव्हा खोली उघडते तेव्हा कट्टरपंथी पीडितांवर हल्ला करतात. एका कट्टरपंथींने महिलेला एवढी मारहाण केली की ती जमिनीवर पडली. याशिवाय हल्लेखोर तरुणांनी शिवीगाळ ही केली. या वेळी हल्लेखोरही अभिमानाने तोंड दाखवतात. मारहाणीनंतर महिला बराच वेळ जमिनीवर बेशुद्ध पडून असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर कट्टरपंथी पीडित पुरुषाकडे जातात आणि त्याला मारहाण करू लागतात.
कट्टरपंथींचा हा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आफताब मकबूल अहमद चंदनकट्टी (२४), मद्रासब मोहम्मद इसाक मंदाक्की (२३) आणि समिउल्ला लल्लनवर (२३) अशी पीडितांवर हल्ला करणाऱ्या कट्टरपंथींची नावे आहेत. दरम्यान आरोपींवर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला, धमकावणे, दंगा करणे. अतिक्रमण करणे, एखाद्याच्या खाजगी क्षेत्रात जबरदस्तीने प्रवेश करणे आणि नुकसान करणे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही या प्रकरणावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “नैतिक पोलिसिंगबद्दल खूप बोलणारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या या विशिष्ट घटनेवर गप्प का आहेत? गैरप्रकार अल्पसंख्याक समाजातील होते म्हणून का? सिद्धरामय्या यांनी या घटनेवर आपली भूमिका स्पष्ट करावी.