जोगेश्वरी येथील भुखंड घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी मंगळवारी सकाळीच ईडीची धाड पडली. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. ‘कर नाही त्याला डर कशाला’ असे ते म्हणाले आहेत. तसेच आमचं सरकार कुठलाही राजकीय आकस ठेवून काम करणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “ईडी महाराष्ट्र सरकारच्या हातात नाही. ‘कर नाही त्याला डर कशाला’ पाहिजे. कुठलाही राजकीय आकस ठेवून किंवा सुड भावनेने काम आमचं सरकार करणार नाही. त्यांनी कोरोना काळात कितीतरी पैसे खाल्ले आहेत. मग आम्ही त्यांना कफनचोर किंवा खिचडीचोर म्हणावं का? यात घाबरण्यासारखं काय कारण आहे. “दुध का दुध पानी का पानी’ होऊद्या. असे ते म्हणाले.
दरम्यान, बुधवारी शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय लागणार आहे. याविषयी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे आणि पहिल्या दिवसापासून बहुमत आमच्याकडे आहे. याशिवाय निवडणुक आयोगाने देखील अधिकृत शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह आमच्या पक्षाला दिलेलं आहे. त्यामुळे निकाल हा मेरिटप्रमाणे मिळायला हवा. हे सरकार नियमानेच स्थापन झालेलं आहे,” असेही ते म्हणाले.