पुणे : १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या सोहळ्याला नाटक आणि मी या विशेष कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुलाखत झाली. यावेळी त्यांनी सर्व मराठी कलाकारांच्या काही चुका परखडपणे सांगत त्यांना मोलाचा सल्ला देखील दिला. यावेळी राज यांनी मराठी कलाकारांना एकमेकांना मान देण्याचा आणि आदराने लोकांसमोर सहकलाकारांना हाक देण्याचाही सल्ला दिला. पुढे ते म्हणाले की, “कारण जर का ही बाब जपली तरच महाराष्ट्रातील मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीला भवितव्य आहे”, असे राज ठाकरे म्हणाले.
“मराठी कलाकारांनी एकमेकांना लोकांसमोर मान देऊन बोललात तरच प्रेक्षक कलाकारांना देखील मान देतील. कलाकारांनी बाहेरच्या इतर चित्रपटसृष्टीतील कलाकारांकडून अदबीच्या आणि आदराच्या काही गोष्टी शिकल्या पाहिजेत. कलाकारांनी एकमेकांना जर का टोपणनावाने हाक मारली किंवा कायम मला ते नाक्यावर दिसत असतील तर मी किंवा प्रेक्षक जो कलाकार सहजतेने दिसत असेल तर त्याचे नाटक किंवा काम पाहायला पैसे देऊन बघायला का जाऊ? त्यामुळे आजच्या १०० वा नाट्य संमेलनाच्या निमित्ताने प्रत्येक मराठी कलाकारांनी ही शपथ घेतली पाहिजे की सहकलाकारांना मान, त्यांना अदबीने नाव घेऊन हाक मारली पाहिजे. आणि आपले मोठेपण त्यांनी स्वतः जपले पाहिजे”. असा सल्ला राज ठाकरे यांनी मराठी कलाकारांना कटाक्षाने दिला.