नंदुरबार : आदिवासी महानायक जयपाल सिंग मुंडा यांच्या जयंतनिमित्त आज ३ जानेवारी रोजी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विश्व आदिवासी विद्यार्थी परिषदेची पहिली बैठक घेण्यात आली. यात विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
नंदुरबार शहरातील आदिवासी शासकीय विश्रामगृह (सर्किट हाऊस) येथे समाजातील सुशिक्षित बांधवांच्या उपस्थित या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी आदिवासी महानायक जयपाल सिंग मुंडा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. बैठकीत विद्यार्थी परिषदेचा लोगो, नाव, ब्रीद आणि परिषदेची काही उद्दिष्टे यावर चर्चा करण्यात आली. परिषदेची स्थापना करण्यासाठी पुन्हा बैठक होणार असून त्याची वेळ आणि ठिकाणी कळवण्यात येईल असे सांगण्यात आले. तसेच जास्तीत जास्ती विद्यार्थ्यानी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले.
यावेळी ऍड.गजमल वसावे, रविंद्र वळवी, तुकाराम पावरा, राकेश वळवी, रामदास पावरा, सायसिंग पाडवी, उमेश कोकणी, भास्कर तळवी, रेणूका बागुल, राजेंद्र पावरा तसेच अप्रत्यक्षपणे उत्तरप्रदेश बनारस हिंदू युनिव्हर्सिटीहुन राहुल पावरा, पुणे येथून अशोक पावरा, राजस्थानहुन इंद्रसिंग वळवी आदी उपस्थित होते.
सध्या परिस्थितीत आदिवासी समाजाला मोठमोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. अर्थात बोगस आदिवासी प्रश्न, आदिवासी प्रवर्गात धनगर आरक्षणाची मागणी, आदिवासी समाजाचे हिंदूकरण, आदिवासींचे धर्मांतरण, विविध पक्षांमध्ये आदिवासी समाजाचे विभाजन, विद्यार्थ्यांची शैक्षणिक समस्या अथवा अन्य. अशा परिस्थितीत समाजाची सर्वात मोठी ताकद, समाजाचे भवितव्य म्हणून ओळखला जाणारा युवक/ विद्यार्थी हा ह्या गोंधळामुळे समाजाकडून पुर्णपणे दुर्लक्षित झालेला आहे. तसेच आजची शिक्षणपद्धती ही फक्त परिक्षा, पुस्तक बेस आधारित आहे. व्यावहारिक शिक्षण कुठेतरी कमी पडतंय. युवकांना कौशल्य आधारित शिक्षण मिळत नाहीय. शिवाय आयुष्यात कोणत्याही परिस्थितीत कशा प्रकारे आव्हानांना सामोरे जावे, याचे ज्ञान त्यांना मिळत नाहीय. युवकांचे व्यक्तीमत्व हे नकारात्मक बनत चालले आहे. तो वेगवेगळ्या नकारात्मक गटात विभागला गेला असून, बेरोजगारीचे शिखर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यात आणखीन भर म्हणून सरकार हळूहळू खाजगीकरण करत आहे. अशा परिस्थितीत आजचा आदिवासी युवक हा पुर्णपणे गोंधळून जातोय आणि त्याचे भविष्य हे दिवसेंदिवस पुर्णपणे अंधकारमय होत चालले आहे. अर्थातच हे अंधकारमय भविष्य फक्त त्या युवकांचेच नाही तर संपूर्ण आदिवासी समाजाचे आहे. कारण भविष्यात आदिवासी समाजाचे भवितव्य आजच्या याच युवकांच्या/ विद्यार्थ्यांच्या हातात आहे आणि आजचा युवक असाच राहिला तर समाजासमोर या युवकांना बळकट करण्यासाठीचे हे सर्वात मोठे आव्हान असेल.
आजच्या आपल्या लहान भावंडांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी सामाजिक जबाबदारी म्हणून आपण सर्व मिळून आपल्या युवकांची शैक्षणिक गुणवत्ता, सामाजिक विचार, बुद्धीमत्ता, तर्कशुद्ध विचार, चिकित्सक वृत्ती अशा प्रकारे सर्वांगीण विकास व्हावा आणि चांगल्याप्रकारे तो समाजासाठी, समाजाच्या अधिक विकासासाठी कटिबद्ध राहावा, यासाठी या स्पेशल विद्यार्थी युनियनची (विश्व आदिवासी विद्यार्थी परिषद ) अत्यंत आवश्यक आहे. या पाशर्वभूमीवर आज आदिवासी महानायक जयपाल सिंग मुंडा यांच्या जयंीनिमित्त या परिषदेची घेण्यात आली. मात्र, आता समाज बांधवांनी एकत्र येऊन, आपण सर्व मिळून काम करणं आवश्यक आहे. त्यासाठी सर्व बाजूंनी अभ्यास, विचार, विमर्श करुन एक एक पाऊल पुढे जाणे महत्त्वाचे आहेत. चला आजचं, आत्ताच ठरवूया आणि समाजासाठी एकजूट होऊया, असे आवाहन विश्व आदिवासी विद्यार्थी परिषदेने केले.