चोपडा,(प्रतिनिधी)- येथील ज्येष्ठ पत्रकार व साथीदारचे संपादक अनिलकुमार द्वा. पालीवाल यांना जागतिक संविधान व संसदीय असो. तर्फे पत्रकारितेतील पन्नास वर्षे अविरत सेवाकार्य तसेच सामाजिक सेवेत उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष पुरस्कार देऊन संस्थेच्या वरिष्ठ सदस्या प्राचार्य डॉ. सुवर्णा बोडके व मान्यवरांच्या हस्ते स्मृती चिन्ह, गौरवपत्र, संस्थेचे मानद सदस्य पत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.अध्यक्षस्थानी महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे होते.
तसेच महाराष्ट्र टाइम्स नाशिकचे वरिष्ठ उपसंपादक गोपाल अनिलकुमार पालीवाल यांना त्यांच्या पत्रकारितेतील दशकपूर्ती सेवेप्रित्यर्थ नाशिक पत्रकार संघाचा कार्यगौरव पुरस्कार घोषित झाला असून येत्या सहा जानेवारी पत्रकार दिनी माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
श्री पालीवाल परिवाराची चौथी पिढी सध्या पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून, समाजसेवा क्षेत्रात स्व. द्वारकादासजी पालीवाल प्रतिष्ठानतर्फे कोणतीही प्रसिद्धी न करता अनेक उपक्रम राबविण्यात येतात. पालीवाल पिता पुत्राच्या या यशाबद्दल महाराष्ट्र पालीवाल परिषद, पालीवाल समाज, लासूर, चोपडा, ज्येष्ठ नागरिक संघ, चोपडा, फेस्कॉम संघटना, नाटेश्वर पत्रकार संघ, लासूर आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.