जळगाव,(प्रतिनिधी)केंद्रात आणि राज्यात शासकीय यंत्रणेत योग्य उमेदवारांच्या अभावी दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या अनेक जागा आजही रिक्त आहेत. शासकीय यंत्रणेसोबतच प्रायव्हेट कंपन्यांमध्येही दृष्टीहीन विद्यार्थ्यांना मोठ्या संधी उपलब्ध आहेत. या जागेवर दृष्टीहीन विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होण्यासाठी दीपस्तंभ फाऊंडेशनचे “अभ्यासमित्र ॲप” हे भविष्यात महत्वाचे ठरणार आहे. भारतात अश्या पद्धतीचे ॲप एका संस्थेने पहिल्यांदाच बनवलेले आहे. जास्तीत जास्त दृष्टीहीन विदयार्थ्यांपर्यंत या ॲपची माहिती पोहचवण्यासाठी शासनाच्या सर्व वेब साईटवर या ॲपची माहिती टाकण्यात येईल आणि या संदर्भात कोणतीही मदत लागल्यास शासनातर्फे ती मदत केली जाईल असे आश्वासन सामाजिक न्याय आणि दिव्यांग सक्षमीकरण मंत्रालय विभाग भारत सरकारचे प्रधान सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले.
२०२४ च्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ जानेवारीला दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबल या दिव्यांग, अनाथ आणि वंचित घटकातल्या विदयार्थ्याच्या उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांसाठी काम करणाऱ्या संस्थेने विषेशतः दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या दीपस्तंभ फाऊंडेशनचे ‘अभ्यासमित्र ॲपच्या’ ऑनलाईन उदघाटन कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी सामाजिक न्याय आणि दिव्यांग सक्षमीकरण मंत्रालय विभाग, महाराष्ट्र सरकारचे प्रधान सचिव अभय महाजन, पॉंडेचरीचे सहाय्यक जिल्ह्याधिकारी सम्यक जैन, रेडिओ उडाणचे दानिश महाजन, डॉ. किरण देसले उपस्थित होते. प्रास्ताविक दीपस्तंभ फाऊंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांनी तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन ऋषिकेश पवार याने केले. आभार मिलिंद पाटील यांनी मानले.
दृष्टीहीन विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या आणि परीक्षेच्या दरम्यान येणाऱ्या अडचणींच्या संदर्भात अभ्यासमित्र हे अतिशय उपयुक्त ॲप असणार आहे. जे विद्यार्थी दृष्टीहीन नसतील त्यांना ही या ॲपचा फायदा होणार आहे. भविष्यात या ॲपच्या माध्यमातून दृष्टीहीन विद्यार्थी रिझर्वरेशन संवर्ग सोडून जनरल संवर्गातून परीक्षा देऊन अधिकारी होतील असा विश्वास सामाजिक न्याय आणि दिव्यांग सक्षमीकरण मंत्रालय विभाग महाराष्ट्र सरकारचे प्रधान सचिव अभय महाजन यांनी व्यक्त केला.
पॉंडेचरीचे सहाय्यक जिल्ह्याधिकारी सम्यक जैन असे म्हणाले कि, हे ॲप दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी त्यांचे आयुष्य बदलविणारे असणार आहे. हे ॲप जास्तीत जास्त दृष्टीहीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहचायला हवे आणि त्या माध्यमातून दृष्टीहीन विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात याची फार मोठी मदत होणार आहे. स्पर्धा परीक्षा देणारा डॉ.हितेश प्रसाद या वेळी बोलताना असं म्हणाला कि, यूपीएससी हि सर्वात कठीण परीक्षा आहे, आणि दृष्टीहीन विद्यार्थ्यांना त्यासाठी लागणारे स्टडी मटेरियल मिळवणे हि मोठी समस्या आहे. या ॲपच्या माध्यमातून ती समस्या सुटणार आहे.
ऑडिओ कोर्सेस (विशेषतः दृष्टिहीनांच्या गरजांसाठी तयार केलेले अभ्यासक्रम), प्रवेशयोग्य अभ्यास साहित्य (प्रवेशयोग्य पुस्तके, नोट्स, चाचण्या आणि बरेच काही) वन टू वन समुपदेशन (वैयक्तिक, शैक्षणिक, मानसशास्त्रीय समुपदेशन), परीक्षेची तयारी (मजबूत पाया आणि अभ्यास योजना) ही या ॲपची वैशिष्ट्ये असून संपूर्ण भारतातील दृष्टिहीन विद्यार्थ्यांना दीपस्तंभ फाऊंडेशनचे अभ्यास मित्र हे ॲप मोफत देण्यात येणार आहे. दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल ही संस्था २००५ सालापासून महाराष्ट्रात गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कार वंचितांपर्यंत पोहोचावे यासाठी कार्यरत आहे.या अंतर्गत दिव्यांग, अनाथ, आदिवासी, ग्रामीण भागातल्या तरुण मुला मुलींसाठी निवासी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण प्रकल्प, उच्च शिक्षण, तंत्रज्ञान प्रशिक्षण, करिअर कौन्सिलिंग, वाचन संस्कार प्रकल्प, ग्रामीण शिक्षण क्रांती केंद्र अशा प्रकारचे प्रकल्प जळगाव व पुणे येथे कार्यरत आहेत.