सेल्फी काढताना पाय घसरल्याने माची प्रबळगडावरून खाली पडल्याने २४ वर्षीय नवविवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. शुभांगी विनायक पटेल (दत्तवाडी, पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे. अवघ्या २० दिवसांपूर्वी विवाह झालेले नवदाम्पत्य ट्रेकिंगकरिता गडावर गेले होते.
शुभांगी आणि तिचा पती विनायक पटेल हे दोघे लोणावळा येथे हनीमूनसाठी २८ डिसेंबर रोजी गेले होते. त्या ठिकाणाहून ते दुपारी २ वाजेच्या सुमारास माची प्रबळगड येथे ट्रेकिंगसाठी गेले. ते वर चढले. यावेळी शुभांगी सेल्फी काढत असताना तिचा पाय घसरल्याने ती वरून खाली पडली.
हा सर्व प्रकार विनायक याच्या डोळ्यांदेखत घडला. शुभांगी अंदाजे दीड ते दोन हजार फूट खाली कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले, पोलिसांसह स्थानिक व निसर्गमित्र यांच्या मदतीने तिला बाहेर काढले. यावेळी फायर ब्रिगेडला पाचारण केले होते. तिला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी रात्री आठच्या सुमारास मृत घोषित केले.