पुण्यात मंतरवाडीमध्ये भीषण अपघात झाल्यांनतर डंपरने चिमुरड्याला चिरडले. यामध्ये त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. एक महिला तिच्या भाचा आणि भाचीला दुचाकीवरुन घेवून शहरात येत असताना एका भरधाव डंपरने त्यांच्या स्कुटीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील 8 वर्षांचा चिमुकला खाली पडून डंपर खाली आल्याने त्याचा मृत्यू झाला. बुधवारी दुपारी ही घटना घडली आहे.
दरम्यान, अपघातानंतर संतापलेल्या जमावाने डंपर पेटवून दिला. यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी काही नागरिकांनी दगड फेक केल्याची माहितीही समोर आली आहे. शौर्य सागर आव्हाळे असे अपघातात ठार झालेल्या चिमुकल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी अक्षय बाबासाहेब भाडळे यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी डंपरचालकाला अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात डंपरने दिली धडक पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी अक्षय भाडळे यांची बहीण तिचा भाचा शौर्य आणि भाची तृणल या दोघांना घेऊन दुचाकीवरून मंतरवाडी येथून घरी जात होत होती. यावेळी एच. पी. पेट्रोल पंपाजवळ आली असता, पाठीमागून भरधाव वेगात डंपरचालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी डंपरची दुचाकीला धडक बसली. यामुळे दुचाकी रस्त्यावर पडली.
डंपरचालक मदत न करताच झाला पसार दुचाकीवर पाठीमागे बसलेला 8 वर्षीय शौर्य हा डंपरच्या चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर डंपरचालक मदत न करता पसार झाला. याप्रकरणी पुढील तपास करण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे मंतरवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात होत आहे.