बीड : भूसंपादनाचा अधिकचा मोबदला मिळावा म्हणून चक्क कोर्टाने दिलेल्या निर्णयातील ६ पाने बदलवून त्याजागी बनावट व अधिकचा मोबदला मिळवण्याच्या उद्देशाने कोर्ट निर्णयातील पान क्रमांक ९, १०, १७, १९, २० आणि २५ नंबर चे पानं बदलल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण…
गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथील पाझर तलावाच्या संपादित जमिनीच्या मावेजाच्या एका प्रकरणात २०१६ साली बीडच्या न्यायालयाने निर्णय दिला होता या निर्णयातील ६ पानेच बदलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सहायक सरकारी वकील यांनी मे.न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला दरम्यान न्यायालयाच्या वतीने कार्यालयीन अधीक्षकांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
न्यायालयाच्या वतीने दिली फिर्याद
जिल्हा व सत्र न्यायालयाचे अधीक्षक नरेंद्र पाठक यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय दंड संहिता १८६० अधिनियमचे कलम ३४, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ नुसार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक करीत आहे.