जळगाव,(प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई चैत्यभूमी येथे जाणाऱ्या अनुयायांची गर्दी लक्षात घेता अनारक्षित विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त अमरावती ते मुंबई दरम्यान विशेष गाडी धावणार आहे.यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या आहेत विशेष ट्रेन
क्र. ०१२१८ ही अमरावती- मुंबई अनारक्षित विशेष गाडी ५ रोजी अमरावती येथून दुपारी ५:४५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ५:२५ वाजता पोहोचेल. तसेच क्र. ०१२१७ ही गाडी ७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून मध्यरात्री पाउण
वाजता सुटेल आणि अमरावती येथे त्याच दिवशी दुपारी १२:५० वाजता पोहोचेल. या गाडीला बडनेरा, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई इथे थांबे असतील आणि गाडीला १४ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील.