जळगाव : प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही भव्य श्रीराम रथ यात्रा प्रबोधिनी एकादशी निमित्त आज गुरुवार रोजी संपन्न होत आहे. रथोत्सवानिमित्ताने आज पहाटे चार वाजता काकड आरती झाली. त्यानंतर प्रभू श्रीरामांच्या उत्सव मूर्तीस महाभिषेक, त्यानंतर मंदिराच्या प्रांगणात सकाळी साडेदहा वाजता श्रीराम रथाचे महापूजन वंशपरंपरेने श्रीराम मंदिर संस्थांचे प्रमुख विश्वस्त, विद्यमान पंचम गादीपती हरिभक्ती परायण मंगेश महाराज जोशी (श्री अप्पा महाराजांचे पाचवे वंशज) यांचे हस्ते करण्यात आले.
वंशपरंपरेने हरिभक्ती परायण श्री मंगेश महाराजांचे हस्ते श्रीराम रथाचे पूजन व महाआरती झाले. त्यानंतर श्रीराम रथावर आरुढ होणारी प्रभू श्रीरामचंद्रांची उत्सव मूर्तीची आरती होऊन रथावर मूर्ती विराजमान झाली.रथाचे अग्रभागी सनई ,नगारा ,चौघडा, झेंडेकरी ,वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळ, श्रीराम भजनी मंडळ, श्री संत मुक्ताबाईंच्या पादुका असलेली पालखी व त्यामागे श्रीराम रथ असा दिंडी प्रदक्षणा म्हणजेच रथयात्रेस दुपारी बारा वाजता श्रीरामांच्या जयघोषात ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान येथून प्रारंभ झाला.
श्रीराम मंदिर , भोईटेगढी ,आंबेडकर नगर, तेली चौक, श्रीराम मंदिराचे मागील गल्लीतून, रथ चौक, बोहरा गल्ली, दाणा बाजार, अन्नदाता हनुमान मंदिर, चैतन्य मेडिकल समोरून, प्रकाश मेडिकल, घाणेकर चौक, सुभाष चौक, सराफ बाजारातील श्री महालक्ष्मी मंदिर येथे भजनाचा कार्यक्रम होऊन श्रीमरी माता मंदिर भिलपुरा मार्गे भिलपुरा येथील संत आप्पा महाराजांचे परममित्र श्री संत लालशहा बाबा यांची समाधी येथे श्रीराम रथाचे सेवाधारी रामसेवक पुष्प हार अर्पण करतील. बालाजी मंदिर, रथ चौकात रथ रात्री बारा वाजेपर्यंत परत येईल रामांच्या उत्सव मूर्ती पालखीत ठेवून वाजत गाजत श्रीराम मंदिरात आणण्यात येतील तेथे प्रभू श्रीराम चंद्रांची शेजारती होईल. रथाकरिता अवघ्या महाराष्ट्राच्या विविध भागातून अखंड असंख्य भावी दर्शनासाठी येत असतात प्रत्यक्ष पंढरीचे पांडुरंग जळगाव येतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.
या रथोत्सवाच्या यशस्वीतेसाठी श्री राम मंदिर संस्थांचे प्रमुख विश्वस्त विद्यमान गादीपती हरिभक्ती परायण गुरुवर्य श्री मंगेश महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थांचे विश्वस्त मंडळी, समस्त श्रीमान भक्त मानकरी सेवेकरी या मंडळींनी परिश्रम घेतले आहे.