भुसावळ : सणासुदीचे दिवस असल्याने रेल्वे गाड्यांना मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी वाढली आहे याचाच फायदा घेत अनेक फुकटे प्रवासी विना तिकीट प्रवास करीत असल्याने भुसावळ विभागात 537 तिकीट तपासणीस यांनी 9 ते 15 नोव्हेंबर या काळात विशेष तिकीट तपासणी करीत 41 हजार 894 फुकट्या प्रवाशांकडून तीन कोटी 73 लाख रुपयांचा दंड अवघ्या सहा दिवसात वसूल केला.
रेल्वेच्या या मोहिमेत 11 नोव्हेंबरला भुसावळ मंडळाच्या इतिहासातील सर्वाधिक तिकीट तपासणीच्या आज पर्यंतच्या दंड वसुलीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत एकूण सात हजार 370 प्रवाश्यांकडून एकूण 68 लाख 85 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. डीआरएम इती पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक धीरेंद्र सिंग, सहायक वाणिज्य व्यवस्थापक (तिकीट चेकिंग) रत्नाकर क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ विभागातील 537 तिकीट तपासणी कर्मचारी यांनी 9 ते 15 नोव्हेंबरपर्यंत विभागामध्ये सखोल तिकीट तपासणी मोहिम राबवून विभागाचा दंड वसुलीचा नवीन विक्रम प्रस्थपित केला. विना तिकीट व आरक्षण तिकीट नसतांना आरक्षण डब्यातून प्रवास करणार्या प्रवासाच्या एकूण 41 हजार 894 प्रकरणांतून एकूण तीन कोटी 73 लाख रुपये दंड वसूल केला आहे.