पाचोरा(प्रतिनिधी)- आदिवासी कोळी जमातीच्या जात व वैधता प्रमाणपत्र तात्काळ मिळण्यासाठी पाचोरा शहर व तालुका आदिवासी कोळी समाज समन्वय समितीतर्फे ४ नोव्हेंबर रोजी शहरातील जारगाव चौफुलीवर राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तसेच जारगाव चौफुली येथुन प्रांताधिकारी कार्यालया पर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला.
याप्रसंगी कोळी समाज तालुका अध्यक्ष किशोर रायसाखडा, अॅड. शांतीलाल सैंदाणे, लेखराज सोनवणे, प्रविण बोरसे, विकास कोळी, राजेंद्र मोरे, दशरथ जाधव, संभाजी शेवरे, ईश्वर महाले, दिपक शेवरे, सुनिल कोळी, प्रविण मोरे, राजेंद्र खैरनार, कौतिक कोळी, सुदाम सोनवणे, ज्ञानेश्वर बोरसे, अनिल शेवरे यांचेसह तालुकाभरातील असंख्य आदिवासी कोळी समाज बांधव उपस्थित होते.
आदिवासी कोळी जमातीच्या जात व वैधता प्रमाणपत्र संदर्भात जळगांव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या २५ दिवसांपासून सुरू असलेल्या तीव्र आमरण अन्नत्याग उपोषणाला जाहिर पाठिंबा देत ४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता पाचोरा शहरातील जारगाव चौफुली येथे पाचोरा शहर व तालुका आदिवासी कोळी समाज समन्वय समितीतर्फे सुमारे अर्धा तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. रास्तारोको आंदोलना नंतर प्रांताधिकारी कार्यालया पर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला. आदिवासी कोळी जमातीच्या जात व वैधता प्रमाणपत्र तसेच जिल्हाधिकारी यांचे १३ आॅक्टोबर २०२३ च्या पत्रानुसार पाचोरा व भडगाव तालुक्यातील कोळी समाजाच्या व्यक्तींना सरसकट अनुसूचित जमातीचे (एस. टी.) प्रमाणपत्र देण्यात यावे. या मागणीचे निवेदन तहसिलदार प्रविण चव्हाणके यांना देण्यात आले आहे.