जळगाव, दि.५ ऑक्टोबर (प्रतिनिधी)- ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी विभागीय क्रीडा संकुलाचे लवकरात लवकर कामकाज सुरू करण्याच्या आणि क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विभागीय क्रीडा संकुलाचे कामकाज सुनियोजित पध्दतीने उत्कृष्ट करण्याच्या जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली योजना, अंदाजपत्रक बाबत वास्तुविशारद, सल्लागारांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यामुळे मेहरूण येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या निर्मिती प्रक्रियेस वेग आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आर्किटेक्ट कन्सल्टंट मे कोलाज डिझाईन प्रा. ली. मुंबई, मे शशी प्रभू अँड असोसिएटस (पुणे) आणि मे व्ही के आर्किटेक्चर (पुणे) यांनी सादरीकरण केले. जिल्हा पोलिस अधीक्षक एम राजकुमार, जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, उप अभियंता गिरीश सूर्यवंशी, शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी प्रदीप तळवेलकर, जिल्हा क्रीडा संघटना प्रतिनिधी राजेश जाधव, तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी, गुरुदत्त चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.
या बैठकीसाठी निमंत्रित नामांकित वास्तुविशारदांनी वानखेडे स्टेडियम (मुंबई), बालेवाडी स्टेडियम (पुणे) विशाखापट्टणम स्टेडियम अशा सुंदर क्रीडागणाची निर्मिती केली आहे. वास्तुविशारदांनी त्यांच्या अनुभवाचा उत्तम वापर करुन जळगाव जिल्ह्यासाठी अत्यंत सुंदर व सर्व सुविधांयुक्त क्रीडांगण उपलब्ध करुन देण्यासाठी चांगला प्रस्ताव सादर करावा. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी दिल्या.
जिल्हाधिकारी श्री प्रसाद म्हणाले की, वास्तुविशारदांनी प्रस्ताव सादर केल्यानंतर गुणवत्तापूर्ण, उत्तम दर्जाचे विभागीय क्रीडा संकुलाचा बांधकाम आराखडा अंतिम करण्यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील पालकमंत्री यांचे अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात येईल. विविध वास्तुविशारदांचे बांधकाम आराखडे पाहुन शासनाच्या निकषानुसार नियमांत बसणाऱ्या व उत्कृष्ट संरचना सादर केलेल्या वास्तुविशारदांचा आराखडा निश्चीत करणेबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल.
या सर्व प्रक्रियेत ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांचा नियमित पाठपुरावा सुरु असून जिल्ह्यातील खेळाडूंच्या तयारीसाठी चांगल्या दर्जाचे विभागीय क्रीडा संकुल मिळावे, खेळांची संस्कृती जोपासली जावी, आंतरराष्ट्रीय दर्जाचे विविध खेळांत निपूण खेळाडू तयार व्हावेत, यासाठी त्यांचे विशेष प्रयत्न आहेत. असे ही जिल्हाधिकारी श्री प्रसाद यांनी यावेळी सांगितले.
००००००००