ळगांव, दि.५ ऑक्टोंबर (प्रतिनिधी) – सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी संबंधित महाविद्यालयांकडे ३० नोव्हेंबर २०२३ पूर्वी व इयत्ता ११वी विज्ञान शाखेतील शिक्षण घेणाऱ्या मागासगर्वीय विद्यार्थ्यांनी ३१ जानेवारी २०२४ पूवी अर्ज सादर करावेत. असे आवाहन जळगांव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केले आहे.
इयत्ता १२ वीनंतरच्या पुढील शैक्षणिक वर्षात विविध व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याना जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी www.bartievalidity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा व अर्जासोबत सर्व कागदपत्रे व पुरावे राजपत्रित अधिकारी अथवा संबंधित प्राचार्य यांच्याकडून साक्षांकित करावे तसेच जन्म-मृत्यू नोंद उतारे यांच्या प्रमाणित प्रती मूळ पुरावे ऑनलाईन अपलोड करावे. ऑनलाईन अर्ज भरतांना अर्जदाराने स्वतःचा ई – मेल आयडी नमूद करावा इतर कोणाचा ई – मेल आयडी नमूद करु नये. तसेच ऑनलाईन अर्ज भरतांना करण्यात आलेला लॉग इन आयडी व पासवर्ड जतन करुन ठेवण्यात यावा. याबाबतची दक्षता अर्जदार व पालकांनी घ्यावी. जेणेकरुन त्यांना भविष्यात जातवैधता प्रमाणपत्र ऑनलाईन मिळणेबाबत अडीअडचणी उद्भवणार नाहीत.
अर्जदाराने खोटे पुरावे प्रकरणासोबत जोडू नयेत. ऑनलाईन अर्ज अपलोड केल्यानंतर सर्व कागदपत्रांसह अर्ज महाविद्यालयांत मुदतीत जमा करावेत. महाविद्यालयांनी प्राप्त अर्ज तात्काळ जिल्हा समितीकडे सादर करावेत.
अर्जदाराने वेळीच समितीकडे अर्ज न केल्यास भविष्यात जातवैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आरक्षणांतर्गत प्रवेश मिळाला नाही तर त्यास तो स्वतः अर्जदार जबाबदार राहील याची नोंद विद्यार्थी व पालकांनी घ्यावी. जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव सादर करण्यासाठी कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीकडे देवू नये. विद्यार्थ्यांनी अर्ज समिती कार्यालयात न देता संबंधित महाविद्यालयांत अर्ज जमा करावेत. महाविद्यालयाच्या स्तरावरील नोडल अधिकारी (समान संधी केंद्र) यांनी एकत्रित अर्ज समिती कार्यालयात सादर करावेत. अर्जासोबत सादर करावयाचे प्रतिज्ञापत्रासाठी १०० रुपयांच्या स्टँप पेपरची आवश्यकता नाही. फक्त नोंदणीकृत शपथपत्र कोऱ्या कागदावर लिहून द्यावे याची सर्व विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी.
जात वैधता प्रमाणपत्राच्या अडचणी संदर्भात बुधवार व गुरूवारी दुपारी ३ ते ६ या वेळेत भेट घेता येणार आहे. असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.