जळगाव ,(प्रतिनिधी) – जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील डांगरी येथील चार वर्षाच्या बालकाला ‘लेप्टोस्पायरोसिस’ आजाराची लागण झाल्याची बाब समोर आली असून अमळनेर तालुक्यात पहिल्यांदाच या आजाराचा रुग्ण आढळून आला आहे.लेप्टोस्पायरोसिस’ हा दूषित पाण्यापासून पसरणारा आजार आहे.
लेप्टोस्पायरोसिस आजाराचे लक्षणं….
रोगबाधित प्राण्यांच्या लघवीतून ‘लेप्टोस्पायरोसिस’ नावाच्या या रोगाचा प्रसार होत असून, या आजारात तीव्र ताप, अंगदुखी, डोळे लालसर होणे, तीव्र डोकेदुखी अशी लक्षणे दिसून येतात. या रोगाचे रुग्ण मुख्यत्वे करून भात व ऊस लागवडीच्या क्षेत्रात तसेच ठाणे, रत्नागिरी, रायगड, पालघर आदी भागांत आढळून येतात.दरम्यान अमळनेर तालुक्यात पहिल्यांदाच या आजाराचा रुग्ण आढळून आला आहे.
बालकाचे कुटुंब कामाला बाहेर गावी होते
बाधित बालकाचे कुटुंबीय ऊसतोडीसाठी बाहेर जिल्ह्यात गेले असल्याची माहिती आहे. परत आल्यावर कुटुंबातील बालक आजारी पडल्याने धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्याठिकाणी तपासणी केल्यावर हे निदान करण्यात आले. सध्या उपचार घेऊन बालक व कुटुंबीय घरी पोहोचले असून, बालकाची प्रकृती स्थिर आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बहेकर यांच्या सूचनेवरून जिल्हा साथरोग अधिकारी प्रमोद पांढरे व डॉ. वाभळे, हिवताप नियंत्रण विभागाचे आरोग्य सहाय्यक विपुल लोणारी व धनराज सपकाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी, डॉ. रनाळकर यांच्यासह पथकाने डांगरी येथे भेट देत पाहणी केली.कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून आली नसली, तरी पुढील १४ दिवस डांगरी गावात सर्व्हे करण्यात येणार आहे.

