जळगाव,(प्रतिनिधी)- दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबल नवीन आवारात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण संस्थेतील ट्रान्सजेंडर विद्यार्थिनी विणा काशीदच्या हस्ते करण्यात आले. विणा पोलीस सब इन्स्पेक्टर होण्यासाठी मनोबल मध्ये मुख्य परीक्षेची तयारी करीत आहे.
ट्रान्सजेंडर बद्दल समाजात अनेक गैरसमजुती आहेत, पण मनोबल प्रकल्पाने आम्हाला समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याची जी संधी दिली, त्यामुळे माझ्यासारख्या अनेक भावा-बहिणीचं आयुष्य आता घडणार आहे. माझ्या हस्ते ध्वजारोहण करून दिलेला सन्मान माझा नसून तो आमच्या सर्व ट्रान्सजेंडर समाजाचा सन्मान आहे अश्या भावना विना काशीदने या वेळी व्यक्त केल्या. या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे पालक कृष्णा पेक्टिन्सचे संचालक डॉ.के.सी.पाटील, धर्मदाय उपायुक्त मोहन गाडे, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, डॉ.तुषार बोरोले, चित्रकार चेतन पाटील, मनोबलचे संचालक परेशभाई शहा, तेजस कावडीया, लक्ष्मण सपकाळे, आर. डी पाटील, सविता भोळे, यजुर्वेंद्र महाजन उपस्थित होते.
प्रास्ताविकात संवाद साधतांना यजुर्वेंद्र महाजन असे म्हणले कि, स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून आपल्याला न्याय, स्वातंत्र्य, बंधुता, दर्जा आणि संधीची समानता घटनेने दिलेले आहेत. नागरिक म्हणूनच आपल्याला ते परस्परांसाठी जपण्याची कर्तव्य म्हणून अपेक्षाही केलेली आहे. मात्र अजूनही समाजातल्या बऱ्याच घटकांना या पद्धतीने जगता येत नाही, त्यापैकी एक घटक म्हणजे ट्रान्सजेंडर. मनोबल हा देशातला पहिला उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठीचा समाजातल्या सर्व घटकांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी संधी देणारा सर्वसमावेशित निवासी प्रकल्प असणार आहे.
आपल्या साठी जे झटत आहेत, मदत करत आहे त्या मदतीच्या हातांना तुमच्या यशाने अर्थ प्राप्त करून त्या हातानं अधिक बळकटी द्या. प्रामाणीक प्रयत्न करत यश प्राप्त करा, पण या दरम्यान संस्थेला न विसरता भविष्यात दानदृष्टी ठेवा असा सल्ला मोहन गाडे यांनी दिला. ज्या क्षेत्रात आवड असेल त्या गोष्टीचा संकल्प करत यश संपादन करा व त्या माध्यमातून स्वतःला आणि देशाला काही मदत होईल त्या दृष्टीने वाटचाल करा अश्या भावना के.सी.पाटील यांनी व्यक्त केल्या. प्रत्येका मध्ये विशेष गुण आहे, फक्त ते ओळखता आले पाहिजे. स्पर्धा परीक्षा हा एकच पर्याय समोर न ठेवता वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याची तयारी ठेवली पाहिजे. ज्या कामात आवड असेल ते काम करताना कंटाळा येत नाही, म्हणून आवडीच्या क्षेत्रात करिअर करा असा सल्ला जयपाल हिरे यांनी विद्यार्थ्यांना या वेळी दिला.
या प्रसंगी प्रज्ञाचक्षू विद्यार्थिनी नीलिमा वावरेनी हार्मोनियम वर देशभक्तीपर गाण्याचे सादरीकरण केले. सुरज केणी याने कॅसीओवर तर रवींद्र पांगुळे याने पखवाज वर देशभक्तीपर गीत सादर केले. सूत्रसंचालन चैतन्य पाणवलकर याने तर आभार माऊली अडकूरने व्यक्त केले.कार्यक्रमाचे सर्व नियोजन दिव्यांग विद्यार्थ्यांनी केले होते.