मुक्ताईनगर – कबचौ उमवि जळगावचे पहिले परीक्षा नियंत्रक कै.सुरेश देवराव देशमुख यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन शनिवार दि. 12 ऑगस्ट रोजी रोटरी हॉल, मायादेवी नगर, महाबळ या ठिकाणी करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. एन के ठाकरे तसेच माजी कुलगुरू डॉ. के बी पाटील व अशोक शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते कै. सुरेश देवराव देशमुख यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
तसेच विद्यापीठ परिसर क्षेत्रातील दिवंगत कर्मचारी, अधिकारी व प्राध्यापक यांना सुद्धा या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आपल्या भावना व्यक्त करत असताना डॉ. एन के ठाकरे साहेबांनी स्व. सुरेश देशमुख यांच्या कार्यकर्तुत्वाचा गौरव करून आठवणींचा उजाळा याप्रसंगी करण्यात आला ते असे म्हणाले की विद्यापीठाचे कामकाज 1990 सालापासून जुन्या आयटीआय असलेल्या इमारतीत पासून ते नव्या इमारतीत जाण्यापर्यंत या खडतर प्रवासात सुरेश देशमुख यांचा मोलाचा वाटा होता, तेव्हापासून त्यांनी परीक्षेचे काम परीक्षांचे अडचणी व त्याचे निराकरण खूप चांगल्या पद्धतीने, प्रामाणिकपणे आणि पारदर्शक केले. त्या काळात विद्यापीठ व विद्यापीठ परिसरातील महाविद्यालय हे कॉपीमुक्त करण्याचा संकल्प यशस्वीपणे त्यांनी राबवला याची दखल महाराष्ट्राने तर घेतलीच पण विद्यापीठाचा नावलौकिक पूर्ण देशात त्यांच्या कार्यामुळेच प्राप्त झाला शांत, संयमी, वक्तशीरपणा, कामातील सातत्य व निष्ठा हे त्यांचे प्रमुख गुण होते म्हणून ते शेवटपर्यंत चांगले काम करू शकले सामाजिक व राजकीय अडचणींचा अडथळा दूर करत परंतु कोणालाही न दुखवता त्यांनी प्रत्येक परिस्थितीवर मात केली, विद्यापीठात दिवस व रात्र काम करत राहिले याचा अनुभव प्रत्येकाला आलेलाच आहे, असे ते याप्रसंगी म्हणाले.
त्यांचं काम व कार्य शिस्तप्रिय व संयमी असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली आणि त्या कामाचा त्यांनी सोनं केलं, सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा बारा वर्षे सेवा त्यांनी प्रवरा ग्रामीण संस्थेचे प्रवरा ग्रामीण आरोग्य विद्यापीठ लोणी जिल्हा अहमदनगर या ठिकाणी परीक्षा नियंत्रक व उपकुलसचिव म्हणून सेवा बजावली.
माजी कुलगुरू डॉ. के बी पाटील यांनी सुद्धा त्यांच्या कार्याचा व कामाचा गौरव करून श्रद्धांजली अर्पण केली.
याप्रसंगी विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संजय सपकाळे, माजी कुलसचिव डॉ. संभाजी देसाई, रंगकर्मी शंभू अण्णा पाटील, अशोक शिंदे, महाविद्यालयीन माजी कर्मचारी जे वी महाडिक आणि परिवारातील सदस्य सतीश देशमुख, नलिनी देशमुख व प्रतापराव सनेर यांनी अनेक आठवणीच्या स्वरूपात भावना व्यक्त केल्या. सभेच्या ठिकाणी कै. सुरेश देवराव देशमुख यांचा मित्रपरिवार, नातेवाईक तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे लोक व सामाजिक व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रद्धांजली सभेच्या आयोजनाची भूमिका प्रा.डॉ.जगदीश पाटील यांनी मांडली, तसेच अशोक शिंदे संस्थापक अध्यक्ष छत्रपती शिवाजी ब्रिगेड जळगाव यांचे सहकार्य लाभले. सभेचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. राजेंद्र देशमुख तर आभार प्रदर्शन श्री प्रसन्न सुरेश देशमुख यांनी केले.