राज्यात महावितरण कंपनीकडून वीजचोरी रोखण्यासाठी अनेक प्रयत्न सुरु असूनही वीज चोरी कमी झालेली नाही. याच दरम्यान, आता वीज चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला. विशेष म्हणजे सरकारी कार्यालयाकडून तब्बल ६७ वर्षांपासून वीज चोरी केली जात होती.
पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील आंधळगाव ग्रामपंचायतीमध्ये हा प्रकार घडला असून ही ग्रामपंचायत सन १९५६ साली निर्माण झाली होती. परंतु आंधळगाव ग्रामपंचायत कार्यालयाने आजपर्यंत कोणतेही अधिकृत वीज कनेक्शन घेतले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ग्रामपंचायतीमध्ये अनधिकृत वीज पुरवठा सुरु आहे. परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांना अजूनपर्यंत हे लक्षात आले नाही. महावितरणकडून विजचोरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. परंतु आता सरकारी कार्यालय असलेल्या ग्रामपंचायतीने हा प्रकार केला आहे. यामुळे महावितरण कोणाविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करणार? आता हा प्रश्न आहे.
लक्षात कसे आले नाही
तब्बल ६७ वर्ष अनधिकृत कनेक्शन असताना महावितरणच्या अधिकाऱ्यांना लक्षात कसे आले नाही? एखाद्या सरकारी कार्यालयाने अधिकृत कनेक्शन घेऊन रितसर वीज बिल भरू नये, याबद्दलही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ग्रामपंचायतीमध्ये १९५६ पासून किती ग्रामसेवक आली असतील, एकानेही यासंदर्भात नियमाचे पालन केले नाही, असे दिसून येत आहे.

