मुंबई । मुंबईतील दहिसर ते मीरारोड स्थानकादरम्यान थरकाप उडविणारी घटना घडली आहे. जयपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये अंदाधूंद गोळीबार झाल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली. धक्कादायक म्हणजे चेतन कुमार या आरपीएफ जवानाने हा गोळीबार केला असल्याचे समजते. या गोळीबारात एका आरपीएफ जवानासह ४ ते ५ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर काही प्रवासी गंभीर जखमी झालेत.
प्राथामिक माहितीनुसार, जयपूर-मुंबई धावत्या ट्रेनमध्ये दोन आरपीएफ जवानांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला, की यातील एका जवानाने आपल्या सहकारी जवानावर अंदाधूंद गोळीबार केला. या घटनेत एका जवानासह ४ ते ५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.
चेतन कुमार या आरपीएफ जवानाने हा गोळीबार केल्यानंतर तो फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, गोळीबाराची घटना लक्षात येताच लोको पायलटने ट्रेन थांबवली. त्यानंतर तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच, जीआरपी पोलीस आणि आरपीएफ पोलिसांनी घटनास्थळावर दाखल झाले. गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने उपचारासाठी बोरिवली येथील भगवती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चेतन कुमार याची मानसिक स्थिती स्थिर नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

