मुंबई । राज्यातील काही भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून दुसरीकडे अद्याप काही भागात पावसाने दडी मारल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, हवामान खात्याने २९ जुलैपर्यंत राज्याच्या सर्वच विभागांत पावसाचा जोर वाढणार असल्याचे सांगितले आहे. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात पावसाचा जोर जास्त राहण्याचे संकेत पुणे वेधशाळेने वर्तवले आहेत.
दरम्यान, ओदिशाच्या किनारपट्टीवर बंगालच्या उपसागरात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यात सगळीकडे पाऊस पडेल.. असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट…
आगामी पावसाचे संकेत पाहता हवामान खात्याकडून पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच संपुर्ण विदर्भासह नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, सध्या मुंबई परिसर आणि कोकणातील अनेक गावे पुराच्या पाण्याने वेढली असली तरी या तुफान पावसाने महाराष्ट्राची यंदाची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर छोट्या धरणांचे दरवाजे उघडावे लागणार असून लवकरच हा सगळा प्रचंड पाणीसाठी मोठ्या धरणांमध्ये जाईल.

