छत्रपती संभाजीनगर : चार वर्षांपासून उद्योजकाकडे चालक म्हणून कामाला असलेल्या एकाने त्यांचे सात लाख रुपये घेऊन पोबारा केला. मात्र गुन्हे शाखा पोलिसांनी त्याला अवघ्या चार दिवसात शोधून आणून त्याच्याकडून सर्व सात लाख रुपये जप्त केले आहेत.
नामदेव जाधव असे आरोपीचे नाव आहे. शेंद्रा एमआयडीसी प्रीतम खिंवसरा यांची कंपनी आहे. १४ जुलैला त्यांचा मुलगा कंपनीत गेला. तेव्हा त्यांना पैशाची आवश्यकता पडल्याने त्यांनी आई प्रीतम यांना फोन करून सात लाख रुपये मागितले. प्रीतम यांनी चालक नामदेव जाधवकडे सात लाख रुपये दिले आणि कंपनीत जाऊन मुलाकडे देण्यास सांगितले. त्यानुसार चालक पैशांचा बॅग घेऊन निघाला, मात्र पैसे पोहचलेच नाही.
चालकाची नियती फिरली अन्
सात लाख रूपये पाहिल्यानंतर चालक नामदेव जाधव याची नियत फिरली. त्याने ही रक्कम कंपनीत नेऊन देण्याऐवजी पैसे हाती पडल्यावर मोबाईल बंद करून पोबारा केला होता. या प्रकरणी अखेर १६ जुलैला एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी चार दिवसात आरोपीला ताब्यात घेतले आहे.