चाळीसगाव : शेतातील पडीक घरात जादूटोणा करत गुप्तधन शोधणाऱ्या टोळीचा चाळीसगाव शहर पोलिसांनी पर्दाफाश केला.दरम्यान जादूटोणा करणाऱ्या 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनास्थळावरून मानवी कवटी व इतर अघोरी पूजेसाठी लागणारे साहित्य देखील पोलिसांनी जप्त केले आहे. सुमारे आठ लाख ३५ हजार १०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
काय आहे प्रकार?
चाळीसगाव शहरातील नागद रोड परिसरातील पेट्रोलपंपाच्या बाजूच्या शेतातील पडीक घरात काही मांत्रिक गुप्तधन काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी तेथे छापा टाकला असता मांत्रिकासह काही जण गुप्तधन काढण्याच्या उद्देशाने पूजा करताना मिळून आले. सर्व जण मानवी कवटीच्या सभोवताली बसलेले होते. मांत्रिक त्याचे साथीदार अघोरी पूजा करताना आढळून आले.
यांना घेतलं ताब्यात?
याप्रकरणी लक्ष्मण श्यामराव जाधव (रा. चाळीसगाव), शेख सलीम कुतुबुद्दीन शेख (रा. चाळीसगाव), अरुण कृष्णा जाधव (रा. आसरबारी, ता. पेठ, जि. नाशिक), विजय चिंतामण बागूल (जेल रोड, नाशिक रोड), राहुल गोपाल याज्ञीकरा (रा. ननाशी, ता. दिंडोरी, जि. नाशिक), अंकुश तुळशीदास गवळी (रा. जोरपाडा, ता. दिंडोरी, जि. नाशिक), संतोष नामदेव वाघचौरे (रा. अशोकनगर, नाशिक), कमलाकर नामदेव उशिरे (रा. गणेशपूर पिंप्री, ता. चाळीसगाव) व संतोष अर्जुन बाविस्कर (रा. अंतुर्ली, ता. एरंडोल) या नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या सर्वांच्या विरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत आणि त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबतच्या अधिनियमाच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.