अकोला : अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर परिसरात काल संध्याकाळी धुव्वाधार पाऊस झाल्यामुळे रेल्वे रूळाखालील भराव वाहून गेला आहे. यामुळे अनेक गाड्या रद्द झाल्या होत्या. काहींचे मार्गही बदलले होते.दरम्यान, ठप्प झालेली वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे.मुंबईकडे जाणारी अप मार्गावरील वाहतूक सध्या सुरू झाली आहे.
मुर्तिजापूर परिसरात काल संध्याकाळी धुव्वाधार पावसामुळे माना आणि कुरुम गावादरम्यान रेल्वे ट्रॅकखालील भराव वाहून गेला. यामुळे मुंबई आणि नागपूरकडे जाणारी रेल्वे वाहतूक काल संध्याकाळी 6 वाजल्यापासून पूर्णपणे थांबली होती. यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं. तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले होते. यामुळे नागपूर ते भुसावळदरम्यान अनेक स्थानकांवर गाड्या खोळंबल्या होत्या.
दरम्यान, आज पहाटेच्या सुमारास ही वाहतूक आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मुंबईकडे जाणारी अप मार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे. हावडा-कुर्ला शालिमार एक्सप्रेस, नागपूर-पुणे एक्सप्रेस भुसावळकडे रवाना झाल्या आहेत. रेल्वे प्रशासनाकडून रात्रभर रेल्वे रुळाच्या दुरूस्तीचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू होते. अद्याप नागपूरकडे जाणाऱ्या डाऊन मार्गावरील रुळाच्या दुरूस्तीचं काम सुरू आहे.
रद्द झालेल्या गाड्या
#12221 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स-नागपूर भूसावळ येथून रद्द.
#01140 महू-नागपूर अकोला येथून रद्द
#12112 अमरावती-मूंबई बडनेरा येथून रद्द
#11121 भूसावळ-वर्धा पॅसेंजर
मार्ग बदललेल्या गाड्या
#22827 अप पुरी-सुरत एक्सप्रेस इटारसी-खंडवा-भूसावळमार्गे
#22940 अप हापा एक्सप्रेस इटारसी-खंडवा -भूसावळमार्गे
#13426 डाऊन सुरत-माल्दा एक्सप्रेस भूसावळ-इटारसी-नागपूर
#22738 डाऊन सिकंदराबाद-हिसार एक्सप्रेस अकोला-पुर्णा-नांदेड

