हल्ली प्रेमविवाह करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात काहीजणांच्या कुटुंबीयांची नाराजी तात्पुरती असते, तर काहीजण मात्र आपल्या मुलांचं तोंडही न पाहण्याची शपथ घेतात. मात्र मुलीने मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्यास एखादी व्यक्ती किती टोकाचं पाऊल उचलू शकते, याचा प्रत्यय तेलंगणा राज्यात नुकत्याच घडलेल्या एका घटनेने आला. वारंगळ जिल्ह्याच्या नरसम्पेट मंडळातल्या इटिकालापल्ली गावाच्या सरपंचाने आपला राग भयानक प्रकारे व्यक्त केला.
इटिकालापल्ली गावचे सरपंच मंडला रवींद्र यांची मुलगी काव्या श्री आणि त्याच गावात राहणारा जलगाम रणजितने पळून जाऊन लग्न केलं. त्यानंतर या नवदाम्पत्याने आपल्या कुटुंबीयांना व्हिडिओ संदेश पाठवला.
आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध लग्न केलं असल्याने त्यांनी आपल्याला माफ करण्याची विनंतीही आई-वडिलांना केली. त्याचबरोबर ‘तुम्ही सुखी राहा आणि मलाही माझ्या नवऱ्यासोबत सुखाने राहू द्या’, असं काव्याने या व्हिडिओतून आपल्या आई-वडिलांना सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे आम्हाला शोधण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही दोघंही आत्महत्या करू, अशी धमकीही तिने कुटुंबीयांना दिली.
या प्रकारानंतर मुलीचे वडील खूप चिडले. त्यांनी रागाच्याभरात रणजित आणि लग्नाला मदत करणाऱ्या त्याच्या मित्रांची घरं जाळून टाकली. पीडितांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं. गावात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.