रावेर । रावेर तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना अचानक पूर आला. यामध्ये रावेर तालुक्यात तीन जण पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. यात एकाचा मृत्यू झाला तर रावेर शहरातील दोन जण बेपत्ता आहेत. यात बेपत्ता असलेल्यांमध्ये रावेर शहरातील एका माजी नगरसेवकाचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.
रावेर तालुक्यात काल बुधवारी रात्री अचानक पावसाने जोर पकडला आणि दोन ते तीन तास मुसळधार पावसाने तांडव केला. यात रावेर तालुक्यातील नागझिरी, अभोडा आणि मात्रान या नद्यांना पूर आल्याने एकच धावपळ उडाली. यात रावेर शहरातील माजी नगरसेवक यांच्यासह एक जण दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेले.
हे दोघे बेपत्ता झाले आहेत. तर मोरव्हाल येथील अभोडा नदीत एका जणाचा मृत्यू झाला आहे. मोरव्हाल येथे बाबुराव रायसिंग बारेला याचा मृत्यू झाला असून त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. तर इतर दोघांचा रात्रीपासून शोध सुरू आहे. दोघे ज्या दुचाकीवरून जात होते ती दुचाकी आढळली असून दोघांचा मात्र अद्याप पर्यंत शोध लागलेला नाही. या घटनेनं तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.