खासदार रक्षाताई खडसे , आ. उन्मेष पाटील यांचा दणदणीत विजय
गुलाबराव देवकर , डॉ. उल्हास पाटील यांचा दारुण पराभव
जळगाव – जिल्ह्यातील रावेर,जळगाव लोकसभा मतदार संघाचा निकाल रात्री उशिरा जाहीर करण्यात आला . दोन्ही ठिकाणी झालेल्या चुरशीच्या लढतीत भाजपने पुन्हा बाजी मारली असून विद्यमान खासदार रक्षाताई खडसे या पुन्हा निवडून आल्या असून त्यांनी डॉ. उल्हास पाटील यांचा ३ लाख ३१ हजार ८५६ हुन अधिक मताधिक्याने पराभव केला . तर जळगाव लोकसभा मतदार संघातून भाजपाचे आ. उन्मेष पाटील यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली असून राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा त्यांनी ४ लाख ८ हजार ९३ इतक्या मोठ्या मताधिक्याने पराभव केला . उन्मेष पाटील यांना ७ लाख ७२ हजार २४ मते पडली . तर पराभूत उमेदवार गुलाबराव देवकर यांना २ लाख ९८ हजार २५१ मते पडली याबाबत निवडणूक आयोगाकडून रात्री उशिरापर्यंत अधिकृत घोषणा होणे बाकी होते . भाजपाने दोन्ही जागा जिंकल्याने बालेकिल्ला अबाधित राहिल्याचे चित्र दिसून आले . दरम्यान यानिवडणुकीसाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि माजीमंत्री एकनाथराव खडसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
रावेर आणि जळगाव मतदार संघाची मतमोजणी एमआयडिसीतील एफसीआयच्या गोडाऊनमध्ये सकाळी ८ वाजता टपाली मतदानाने सुरु झाली . निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी दोन्ही मतदार संघाची मतमोजणी करायला सुरुवात केली . यावेळी विविध राजकीय पक्षांचे उमेदवार आणि समर्थकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती . सुरुवातीला दोन्ही मतदार संघातील भाजपच्या उमेदवारांनी आघाडी घेतली . दुपारपर्यंत आघाडी कायम राहिल्याने इतर पक्षांच्या समर्थकांनी मतमोजणीस्थळाहून काढता पाय घेतला . भाजपचे उमेदवार निवडून येण्याची चिन्हे दिसून येताच अनेकांच्या चेहऱ्यावर निराशा पसरली होती . तसेच सायंकाळ पर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयांमध्ये शुकशुकाट पसरलेला होता.
दोन्ही विजयी उमेदवार भाजपच्या जिल्हा कार्यालयात आले . तेथे आ. राजूमामा भोळे,किशोर काळकर , ललित कोल्हे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष
जळगाव : लोकसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर होत असून त्यात भाजपच्या उमेदवारांची विजयाकडे वाटचाल सुरु असल्याचे पाहून भाजप कार्यकर्त्यांनी दुपारपासूनच जल्लोष करण्याला सुरुवात केली . विजयी उमेदवार उन्मेष पाटील आणि आ. राजूमामा भोळे , खासदार रक्षाताई खडसे , माजी आ. चिमणराव पाटील , किशोर काळकर , ललित कोल्हे आदी भाजप कार्यालयासमोर झालेल्या जल्लोषात सामील झाले होते.
उन्मेष पाटील हे भाजप कार्यालयात दाखल झाले. त्यांनीही पक्षाचा ध्वज हाती घेऊन आनंदोत्सव साजरा केला.यावेळी पेढे भरवून आणि फटाके फोडून आंनदोत्सव साजरा करण्यात आला .