जळगाव । जळगावात खुणांची मालिका सुरूच असून अशातच बांभोरी येथील २२ वर्षीय तरुणाची डोक्यात कुऱ्हाड घालून हत्या करण्यात आली. ही घटना जळगाव शहरापासून जवळच असलेल्या गिरणा नदीपात्रात शुक्रवारी रात्री उघडकीस आलीय. या घटनेने मोठी खळबळ उडाली. मात्र ही हत्या का करण्यात आली? मारेकरी कोण? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
याबाबत अधिक असं कि, जळगाव पासून काही अंतरावर असलेल्या बांभोरी गावातील शनिपेठ भागात आशिष उर्फ बाळा प्रकाश शिरसाळे (वय २२, रा. शनिपेठ, बांभोरी ता. धरणगाव) हा आई-वडील आणि आपल्या मोठ्या भावासह राहतो.
आशिष हा शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास आशिष हा जेवण झाल्यानंतर गावापासून काही अंतरावर असलेल्या गिरणा नदीपात्रामध्ये शौचास गेला होता. यादरम्यान रात्रीच्या काळोख्यात काही अज्ञात व्यक्तींनी त्याच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून त्याची हत्या केली.
बराच वेळ झाला आशिष घरी आला नाही म्हणून त्याची शोधाशोध झाल्यानंतर काही वेळाने गिरणा नदी पात्रात तो रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी रात्रीच चोपडा विभागाचे पोलीस उपअधीक्षक कृषिकेश रावले, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, धरणगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक ढमाले तसेच पाळधी पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांनी भेट देत पाहणी केली. मयत तरुणाची हत्या कोणी आणि कोणत्या कारणासाठी केली? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनास्थळी काही अंतरावर पोलिसांना त्याचा फुटलेला मोबाईल सापडला. दरम्यान, या हत्येच्या घटनेमुळे बांभोरीसह जळगाव जिल्हा हादरला आहे. जिल्हा रुग्णालयात तरुणाच्या कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला. दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु आहे. हत्येचं नेमकं कारण समोर आलेलं नसून वैयक्तिक वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी दिली आहे.