जळगाव । धरणगाव तालुक्यातील खर्दे येथे पतीने पत्नीचे मातीत तोंड खूपसून मरेस्तव मारहाण केली होती. त्यांनतर साप चावल्याचा बनाव करणाऱ्या पतीला जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. नामदेव रामा जाधव असं आरोपी पतीचे नाव असून घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही सरकारी अभियोक्तांनी परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे मांडलेला युक्तिवाद आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे नामदेव रामा जाधव याच्याविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला.
नेमकी घटना काय?
खर्दे येथे ३० डिसेंबर २०२१ ला नामदेव जाधव याचे पत्नी विठाबाईसोबत कोळशाच्या भट्टीसाठी गवत आणण्यावरून वाद झाला. विठाबाई यांनी पतीला शिवीगाळ केली. त्याचा राग येऊन नामदेव याने जवळ पडलेल्या लाकडी दांडक्याने विठाबाईस मारहाण केली. तिचे तोंड बंद होईना, म्हणून तिला जमिनीवर खाली पाडून मातीत तोंड खूपसून मरेस्तव मारहाण केली.
पत्नी विठाबाई मेल्यानंतर तिला उचलून नामदेव याने साप चावल्याचा बनाव केला. विठाबाईला जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉ. नीलेश देवराज यांनी शवविच्छेदन अहवालात मृत महिलेचा चेहरा व अंगावर तब्बल १७ जखमा होत्या, तसेच तोंडात माती आढळून आली.
मृत महिलेला बोथट हत्याराने मारहाण केली. जीव गुदमरून तिचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते. पोलिस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी नामदेव जाधव याला अटक केली.
जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश एस. एस. सापतनेकर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी अभियोक्ता ॲड. सुनीलकुमार चोरडीया यांनी शवविच्छेदन करणारे डॉ. नीलेश देवराज, गुन्ह्याचे तपासाधिकारी सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे, संशयित नामदेव याने बाळू रामदास चव्हाण याच्याकडे दिलेल्या कबुलीनुसार त्याचा जबाव, अशा नऊ साक्षीदारांच्या साक्षी, वैद्यकीय अहवाल, न्यायवैद्यक शास्त्राचा अहवाल, अशा पुराव्यांच्या आधारावर संशयित नामदेव जाधव याच्याविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला. न्यायाधीश सापतनेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.