जळगाव । सरकारकडून गोरगरिबांना शिधापत्रिकेद्वारे रेशन पुरविले जाते. मात्र यातही स्वस्त धान्य दुकानावरील सेल्समन गोर गरिबांच्या धान्यावर डल्ला मारत आहे. अशातच गोद्री येथील तरुणांनी ‘मेरा राशन” ॲपच्या माध्यमातून धान्य घोटाळा उघडकीस आणला आहे. या विषयी गोद्री गावात माहिती मिळताच अनेक लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानाकडे धाव घेतल्याने या ठिकाणी बराचवेळ गर्दी झाली होती.
गोद्री येथील संदीप समाधान कोळी यांना विकास व सेल्समन कृष्णा चव्हाण यांनी २० किलो धान्य दिले. धान्य घेतल्यानंतर कोळी यांनी कमी धान्य मिळाल्याबाबत शंका आली. सोबत असलेल्या मित्राच्या माध्यमातून मेरा रेशन या मोबाइल ॲपच्या माध्यमातून त्यांनी ऑनलाइन पडताळणी केली. त्यावेळी ५० किलो धान्य मंजूर असल्याचे ऑनलाइन यादीत दिसत असले तरी प्रत्यक्षात कोळी यांना फक्त २० किलो धान्य मिळाले होते. कोळी यांनी विविध कार्यकारी सोसायटीच्या रेशन दुकानाजवळ गोंधळ करताच गावातील अनेक तरुण जमले.
यापैकी अनेकांनी गेल्या दोन दिवसांत धान्य नेलेले होते. त्यांनीही मेरा रेशन या मोबाइल ॲपवर आपला आधार क्रमांक टाकून मंजूर धान्याबाबत पडताळणी केली. त्यावेळी मिळालेले धान्य व मंजूर धान्य यात सरासरी ५ ते १५ किलोंची तफावत आढळून आली. त्यामुळे संतप्त झालेल्या तरुणांनी सेल्समन चव्हाण यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. तरुणांच्या प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरे देत ‘चुकून झाले असेल तर धान्य घेऊन जा”, असे म्हणून सारवासारव करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. दरम्यान, या विषयी गोद्री गावात माहिती मिळताच अनेक लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानाकडे धाव घेतल्याने या ठिकाणी बराचवेळ गर्दी झाली होती.