रायगड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर भव्यदिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवप्रेमींसाठी मोठं गिफ्ट दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी किल्ले रायगडावरुन तीन मोठ्या घोषणा केल्या आहेत.
नेमक्या काय आहे त्या घोषणा :
किल्ले रायगडाच्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारण्यात यावी अशी मागणी आमदार भरत गोगावले यांनी केली होती. त्यांची ही मागणी मान्य झाली आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, ‘भरत गोगावलेंनी केलेली मागणी सरकारने मान्य केली आहे. 45 एकर जागा शिवसृष्टीसाठी देण्यात आली आहे. शिवसृष्टीसाठी 50 कोटी रुपये देण्यात येणार आहे. जसजसे पैसे लागतील तसे पैसे देऊ. शिवसृष्टीसाठी पैसे कमी पडणार नाही. शिवरायांच्या आशिर्वादाने आणि प्रेरणेने आपण राज्याचा कारभार हाकत आहोत. त्यामुळे शिवरायांच्या स्वप्नातली शिवसृष्टी साकारण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.’
मुख्यमंत्र्यांनी प्रतापगडाबाबत देखील मोठी घोषणा केली आहे. प्रतापगड प्राधिकरण करावे अशी मागणी उदयनाराजे भोसले यांनी केली होती. त्याची ही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. त्यानुसार आज मुख्यमंत्र्यांनी प्रतापगड प्राधिकरणाची घोषणा केली. तसंच प्रतापगड प्राधिकरणाचे अध्यक्ष भाजप खासदार उदयनराजे भोसले यांना करण्यात आले असल्याचे देखील त्यांनी यावेळी जाहीर केले.
एकनाथ शिंदे यांनी यावेळी आणखी एक मोठी घोषणा केली ती म्हणजे भवानी तलवारीबाबत. त्यांनी सांगितले की ‘लंडनच्या संग्रहालयातील भवानी तलवार आणि वाघ नख्या महाराष्ट्रात परत आणण्यासाठी सरकारचा प्रयत्न सुरु आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला मदत करतील. आपले हे स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही.’