जळगाव : रेल्वे विभागात रेल्वे ट्रॅक मेन्टेंनन्स म्हणून तब्बल ३२ सेवा बजावली. मात्र सेवानिवृत्तीच्या दिवशी रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. सुरेश मोहन सोनवणे (वय ६०, रा. वाकीरोड, जामनेर) असे मयत रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे.
नेमकी घटना काय?
जामनेर शहरातील वाकी रोड परिसरातील रहिवासी सुरेश मोहन सोनवणे हे रेल्वे विभागात रेल्वे ट्रॅक मेंटेनन्स म्हणून नोकरीला होते. त्यांची सध्या पाचोरा येथे नियुक्ती होती. त्यांची ३१ मे रोजी ६० वर्षे पूर्ण झाल्याने त्यांच्या नोकरीतील शेवटचा दिवस होता. आज ते सेवानिवृत्त झाले. नियुक्ती असलेल्या पाचोरा (Pachora) येथील कार्यालयात सेवानिवृत्तीबद्दल सुरेश सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. तर दुपारी भुसावळ येथे सेवानिवृत्त झालेल्या अन्य कर्मचाऱ्यांसोबत सुरेश सोनवणे यांचाही सत्कार होणार होता.
सत्कारासाठी सुरेश सोनवणे दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पाचोरा रेल्वे स्थानकावरुन काशी एक्स्प्रेसने भुसावळ येथे जाण्यासाठी निघाले. पाचोरा रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे खंबाजवळ त्यांचा जखमी (Accident) अवस्थेतील मृतदेह आढळून आला. पोलीस तसेच रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी पोहचेपर्यंत सुरेश सोनवणे यांची प्राणज्योत मालवली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाचोरा लोहमार्ग पोलीस दुरक्षेत्राचे मुख्य कर्मचारी शिवशंकर राऊत आणि रामेश्वर निंबाळकर हे घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.