पाचोरा : पाचोरा तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाच महिन्याच्या बाळाला पोटाला बांधून विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना लासगाव (ता. पाचोरा) गावाजवळील परिसरात ही घटना घडली. लाजनाबी आरिफ खान असं मृत महिलेचे नाव असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
लासगाव (ता. पाचोरा) येथील आरिफ खान या तरुणाचा विवाह गावातीलच मामाची मुलगी लाजनाबी हिच्याशी झाला होता. त्यांना मुलगाही झाला होता. दरम्यान २८ मेस लासगाव येथेच समाजातील विवाह सोहळा असल्याने खान कुटुंबियांना विवाहासाठी सहकुटुंब आमंत्रित करण्यात आले होते. त्यासाठी आरिफ खान विवाह सोहळ्यासाठी निघाले. मी बाळाची तयारी करून त्याला सोबत आणते तुम्ही जा; असे लाजीनाबीने सांगितले. यामुळे आरिफ खान आई वडिलांसोबत विवाह सोहळ्यासाठी गेला.
बराच वेळ झाला तरी लाजीनाबी विवाहस्थळी न आल्याने आरिफ खान त्यांना पाहण्यासाठी घरी गेले. मात्र घर बंद दिसले. पत्नी लाजीनाबी घरीही नाही व विवाहाच्या ठिकाणीही नाही हे पाहून गावातील काही नातलगांकडे शोध घेण्यात आला. परंतु ते मिळून न आल्याने आरिफ खान यांनी सायंकाळी पाचोरा पोलीस ठाण्यात मुलासह पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी विवाहितेचा शोध सुरू केला असतानाच आज गावालगतच्या शेतशिवारात लाजिनाबीसह पाच महिन्याच्या असदचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. घटनेचा पंचनामा करून मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात आणले.
लाजीनाबीने पाच महिन्याच्या गोंडस बाळासह आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल का उचलले? याबाबत तर्क वितर्क केले जात असून खऱ्या कारणापर्यंत पोहोचण्याचा पोलीस शोध घेत आहेत.