जळगाव, दि. २९ ( प्रतिनिधी) – केळी आणि बटाटा जागतिक पातळीवरचे महत्त्वाचे कृषी उत्पादन असून या दोहोंमध्ये भरपूर पोषणमूल्ये व खाद्यान्न सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे गुण आहेत. भविष्यात वाढत्या लोकसंख्येचा विचार करता जगाचे पोट भरण्याची क्षमता केळी, बटाट्यामध्ये आहे असा सूर केळी उत्पादकांच्या परिसंवादात तज्ज्ञांचा उमटला. केळीवर वातावरण बदलामुळे झालेले बदल तसेच बटाट्याचे गुणवत्तापूर्ण बियाणे या विषयांवर तज्ज्ञांनी आपले मोलाचे विचार मांडले. जैन हिल्स येथे राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी ‘केळीवरील रोगराई व्यवस्थापन कार्यशाळा व बटाट्याचे गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मिती’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा पार पडली.
परिश्रम, कस्तुरबा हॉल, बडी हांडा व सुबीर बोस हॉल या चार ठिकाणी विविध विषयांवर शास्त्रज्ञ व अभ्यासकांनी संशोधन पेपर सादर केले. परिश्रम हॉलला सकाळच्या सत्रात केळीवरील रोगराई व्यवस्थापन व कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेचे अध्यक्ष अमितसिंग मेमोरियल फाउंडेशनचे तथा चाईचे अध्यक्ष डॉ. एच.पी. सिंग होते, को चेअरमन तिरुचिरापल्ली एनआरसीबीचे संचालक डॉ. आर. सेल्व्हराजन होते. डॉ. टी. दामोदरन, डॉ. प्रकाश पाटील, डॉ. अनिल पाटील, के.बी. पाटील, केळी उत्पादक प्रगतशील शेतकरी डी. के. महाजन हे व्यासपीठावर उपस्थित होते. केळीचे उत्पादन व त्यावर होणारा बदल्या हवामानाचा परिणाम, धोरणात्मक योजन, केळी कीड व रोग नियंत्रण, कार्यक्षम नवतंत्रज्ञान यावर तज्ज्ञांचे सादरीकरण झाले.
डॉ. टी. दामोदरन यांनी पनामा रोगाचे व्यवस्थापन व महाराष्ट्रात रोग येवू नये यासाठी काय खबरदारी घ्यावी यावर संबोधन केले.
यात डॉ. आर. सेल्व्हराजन यांनी सांगितले की, जागतिक स्तरावर केळीमध्ये भारत खूप मागे होता परंतु उच्च गुणवत्तेची टिश्युकल्चर रोपे जैन इरिगेशनसह काही मोजक्या कंपन्यांनी उपलब्ध करून दिले तसेच आधुनिक सिंचन व फर्टिगेशन तंत्रज्ञानामुळे चांगल्या दर्जाची केळी उत्पादन होत आहे. केळी पिकावरी कीड व रोगांचा सामना
करण्याण्यासाठी व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे महत्त्वाचे विचार त्यांनी मांडले. यावेळी प्रगतशील शेतकरी डी. के. महाजन, डॉ. एच.पी. सिंग, डॉ. प्रकाश पाटील यांनी देखील आपले मौलीक विचार मांडले. डॉ. सुरेश कुमार यांनी केळी प्रक्रिया उद्योगातील व्यवसाय व संधी, डॉ. के.जे. भास्करन यांनी केळी उत्पादनासाठी अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन व कॅलकुलेशन- माती परिक्षणानुसार व्यवस्थापन यावर सविस्तर मार्गदर्शन केले.डॉ. करपगम यांनी केळी निर्मिती व वापर, डॉ. एम. एस. सरस्वती यांनी केळी रोपांवरील संशोधन पेपर सादरीकरण केले. डॉ. लोगनाथन नवीन तंत्रज्ञानातून रोगाचे व्यवस्थापन यावरही मार्गदर्शन केले. डी. के. महाजन यांनी केळी पिकातील समस्यांवर संशोधन करून केळी उत्पादकांना मार्गदर्शन होणे गरजेचे आहे असे नमूद केले. के. बी. पाटील यांनी डि. के. महाजन यांच्या मनोगताचा हिंदी अनुवाद केला.
केळी परिषदेसाठी जळगाव, बऱ्हाणपूर, आनंद, बडवाणी, शिरपूर, सोलापूर येथील बिहार, उडिसा या राज्यातील केळी उत्पादक सहभागी झाले. प्रशांत महाजन, संतोष लवेटा, विशाल अग्रवाल, संदीप पाटील, योगेश पटेल, सचिन महाजन, महेंद्र सोलंकी, प्रेमानंद महाजन, आशुतोष पाटीदार, अशोक पाटीदार, जगदीश जाट, ईश्वर पाटील, पद्माकर पाटील, बापू गुजर यासह २५० शेतकरी सहभागी झाले होते.
दुपारच्या सत्रामध्ये ‘बटाट्याचे गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मिती’ या विषयावर संशोधक व अभ्यासकांनी विचारमंथन केले. प्रास्ताविक डॉ. बिरपालसिंग यांनी केले. शिमला येथील सीपीआरआयचे संचालक डॉ. ब्रजेशसिंग यांनी आपले सादरीकरण केले, त्यात त्यांनी भारतीय उष्ण हवामानामध्ये कमी पाण्यात येणाऱ्या बटाटाच्या वाणांविषयी माहिती दिली. एरोपोनिक्स बटाट्याविषयी सांगतांना गुणवत्तापूर्ण बटाटा बियाणे यातूनच चांगले उत्पादन शक्य असल्याचे ते म्हणाले. पूर्वी एका रोपातून सहा तर आता या तंत्रज्ञानामुळे ५० हून अधिक बटाटा बियाणे तयार केले जाते असेही ते म्हणाले. गुजरात येथील बटाटा उत्पादक शेतकरी महेशभाई पटेल, अरविंदभाई पटेल यांनी शेतकऱ्यांच्या वतीने बटाटा पिकांमध्ये येणाऱ्या समस्यांवर प्रकाशझोत टाकला.
यात अरविंदभाई म्हणाले की, बटाट्यावर काळे डाग आल्याने त्याचा दर्जा खालावतो त्यावर शास्त्रज्ञ व तज्ज्ञांनी त्यावर उपाय शोधावा असे सांगितले तर महेशभाई यांनी आतापर्यंत बटाट्याचे अनेक कंपन्यांच्या बियाण्यांची लागवड केली परंतु सर्वात चांगले गुणवत्तापूर्ण बियाणे जैन इरिगेशनकडून मिळाले. त्याबाबत ठळक अनुभव विषद केला. यावेळी एम.डी. ओझा यांनी बटाटा बीज निर्मिती यावर प्रकाश टाकला, डॉ. आर.के. सिंग यांनी बिजनिर्मितीतील तंत्रज्ञानामध्ये झालेले बदल, डॉ. रविंद्र कुमार यांनी उत्तम बीज निर्मितीबद्दल सांगितले. उत्तर बंगाल कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस.के. चक्रवर्ती यांनी आपले संशोधनपर अनुभव सादर केले.
या परिषदेच्या तिसऱ्या दिवशी ३० मे रोजी दुपारी उद्यानरत्न पुरस्काराचे वितरण होणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय फलोद्यान परिषदेमध्ये विविध विषयांवरील संशोधन पेपर यातील शेती उपयुक्त शिफारशींचा धोरणात्मक दृष्टीने स्वीकार करण्याच्या दृष्टीने मांडणी केली जाईल.