छत्तीसगडमधील पंखजूरमध्ये एका अधिकाऱ्याने धरणात पडलेला मोबाईल शोधण्यासाठी लाखो लिटर पाणी वाया घालवले. आंघोळीला गेलेल्या अन्न निरीक्षकाचा फोन धरणात पडताच त्यांनी प्रथम डायव्हरची मदत घेतली आणि यश न आल्याने त्यांनी 21 लाख लिटर पाणी वाया घालवल्याचा प्रकार घडला आहे. हे प्रकरण छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील आहे. शेवटी मोबाईल मिळाला पण तो खराब झाला. आता अन्न निरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. अंदाजानुसार, सोडलेल्या पाण्याने 1,500 शेतात सिंचन केले जाऊ शकते.
कोयलीबेडाचे अन्न निरीक्षक खेरकेट्टा परळकोट जलाशयावर सुट्टीसाठी गेले होते. येथे अंघोळ करत असताना अधिकाऱ्याचा महागडा फोन पाण्यात पडला. पाण्यात पडल्यानंतर अधिकाऱ्याने फोन शोधण्यासाठी 15 फुटांपर्यंत भरलेला जलाशय रिकामा करण्याचा विचार केला आणि पंप बसवून पाणी कमी करण्यास सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्याने याआधी गोताखोर आणि गावातील लोकांचा मोबाईल शोधण्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र मोबाईल सापडला नाही. यानंतर जलाशयात पंप बसविण्यात आला.
30 एचपी पंप 3 दिवस चालला
अधिकाऱ्याचा बुडालेला मोबाईल शोधण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते. या दरम्यान धरणातील पाणी बाहेर काढण्यासाठी 30 एचपी क्षमतेचा पंप तीन दिवस चालवण्यात आला. जास्तीचे पाणी वाहून गेल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंप बंद करून घेतला. तोपर्यंत खूप उशीर झाला होता. जलाशयातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला होता. पंप बंद केल्यानंतर पुन्हा मोबाईल शोधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईलही सापडला मात्र तो खराब झाला.