अमळनेर : मुलाचे किंवा मुलीचे लग्न सोहळा म्हटला की घरात सर्व तयारी अन् आनंदाला उधाण असते. यात मुलगा एकुलता एक असला तर हा आनंद काही औरच असतो. परंतु, डोळे मिटण्यापूर्वी आपल्या एकुलत्या एक मुलाचे लग्न डोळ्यासमोर व्हावे, अशी इच्छा असलेल्या आईने मुलाच्या हळदीच्याच दिवशी जगाचा निरोप घेतला. ही मन हेलावून टाकणारी घटना अमळनेर तालुक्यातील निम येथे घडली असून सरलाबाई गुलाब गुर्जर (वय ५२ रा. निम, ता अमळनेर) असं मृत आईचं नाव आहे. छातीवर दगड ठेवून नातेवाईकांनी मुलाचे लग्न लावून आईची ईच्छा पुर्ण केली.
अमळनेर तालुक्यातील पाडळसरे गावापासून काही अंतरावर निम गाव आहे. या निम गावात सरलाबाई गुर्जर हे पती गुलाब सुपडू गुर्जर, मुलगा राकेश व मुलगी यांच्यासह वास्तव्यास होत्या. राकेश हा बांधकाम अभियंता आहे. गेल्या वर्षभरापासून सरलाबाई यांना कर्करोगाने ग्रासले होते.
आपल्या जीवाचे कधीही काहीही होऊ शकते, त्यामुळे डोळे मिटण्यापूर्वी आपल्या एकुलत्या एक मुलाचे लग्न डोळ्यासमोर व्हावे, अशी इच्छा सरलाबाई गुर्जर यांनी पती गुलाब यांच्याकडे व्यक्त केली. पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी गुलाब गुर्जर यांची धडपड सुरू झाली. गुलाब गुर्जर यांनी नातेवाईकांना सोबत घेत मुलगा राकेश याच्यासाठी मुलीचा शोध सुरू केला. चोपडा तालुक्यातील मंगरुळ गावातील शेतकरी कुटुंबातील उच्चशिक्षित रोहिणी अशोक पाटील हिच्याशी राकेश याचा विवाह जुळला.
यानुसार ३ मेस हळद व ४ मेस विवाह सोहळा नियोजित केला.लग्न दोन दिवसांवर असताना आई सरलाबाईला अधिक त्रास जाणवू लागला. यामुळे अमळनेर येथे उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांना नातेवाईकांनी लग्नाची कल्पना देऊन ठेवली होती. हळदीचा दिवस उजाळला. ३ मेस देवांना नारळ अर्पण करून हळद लावण्याआधी मुलगा राकेश व नववधू रोहिणी यांनी रुग्णालयात अंथरुणावर असलेल्या आई सरलाबाईचे आशीर्वाद घेतले. आई सरलाबाईने नववधू– वर मुलाला जोडीत पाहून प्रसन्न होऊन आशीर्वाद देऊन बेटा नाराज राहू नको, मी लवकर उठून उभी राहील काळजी करू नको. सून रोहिणीला अष्टपुत्र सौभाग्यवती म्हणत दोन्हींच्या पाठीवरून हात फिरविला. हळदीला उशीर होईल म्हणून लवकर जायला सांगितले.

