मुंबई : वाढते उन, अवकाळी पाऊस यानंतर आता देशात चक्रीवादळ येणार आहे. बंगालच्या उपसागरात ५ ते ११ मे दरम्यान चक्रीवादळ तयार होऊन ते बांग्लादेशच्या किनारपट्टीला धडकणार आहे. या वादळाला ‘मोचा’ हे नाव देण्यात आलं आहे. एकंदरीत देशासाठी हा धोक्याचा इशारा असू शकतो.
यूएस हवामान अंदाज मॉडेल ग्लोबल फोरकास्ट सिस्टम (GFS) आणि युरोपियन सेंटर फॉर मीडियम-रेंज वेदर फोरकास्ट (ECMWF) अंदाजानुसार मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
दक्षिण बंगालच्या उपसागरात डिप्रेशनची निर्मिती होणार असल्याने हे चक्रीवादळ तयार होणार आहे. भारतीय हवामान विभागाने देखील यासंदर्भात माहिती दिली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात येत्या काही दिवसांत मान्सूनपूर्व पहिले चक्रीवादळ तयार होऊ शकते. हे चक्रीवादळ येत्या ५ ते ११ मे दरम्यान तयार होण्याची शक्यता आहे. ११ ते १५ मे दरम्यान, हे वादळ बांग्लादेशला धडकणार आहे.
१२ ते १४ मे रोजी मध्यरात्रीनंतर हे चक्रीवादळ म्यानमारच्या राखीव राज्य आणि बांग्लादेशच्या चट्टोग्राम किनारपट्टीवर धडकू शकते. या चक्रीवादळाचा वेग ताशी १५० ते १८० किमी राहू शकतो. भारताच्या ओदिशा किनारपट्टीला देखील हे वादळ धडकू शकते. या वादळाचे ‘मोचा’ असे नामकरण यमनने केले आहे.

