नवी दिल्ली : तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीच्या आघाडीवर मोठा दिलासा दिला आहे. कंपन्यांनी आज म्हणजेच 1 मे पासून व्यावसायिक सिलिंडरच्या किमती 171.50 रुपयांनी कमी केल्या आहेत. मात्र घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींमध्ये सध्या कोणताही बदल झालेला नाही.
अनेक शहरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती बदलल्या आहेत. नव्या दरानुसार आता व्यावसायिक सिलेंडरची किंमत मुंबईत 1808.50 रुपये असणार आहे. दिल्लीत 1856.50 रुपये, कोलकातामध्ये 1960.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 2021.50 रुपये आहे. तेल कंपन्यांनी त्यांच्या वेबसाइटवर नवीन दर अपडेट केले आहेत.
दर महिन्याच्या 1 तारखेला सरकारी तेल कंपन्या गॅसच्या किमतीत बदल करतात. १ एप्रिल २०२३ रोजी देखील व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीतही कपात करण्यात आली होती. त्यानंतर गॅस सिलेंडर सुमारे 92 रुपयांनी स्वस्त झाला होता. तर मार्चमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 350 रुपयांहून अधिक वाढ झाली होती.
हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडर वापरतात. त्याचा घरगुती वापर करता येत नाही. घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या वजनात फरक आहे. व्यावसायिक LPG सिलेंडर 19 kg गॅसने भरलेला असतो आणि घरगुती LPG सिलेंडर 14.2 kg गॅसने भरलेला असतो.
दरम्यान, मार्च 2015 पासून मोदी सरकारने घरगुती स्वयंपाकाच्या गॅसवर दिलेली सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाठवण्याचा उपक्रम सुरू केला होता. तेव्हा लोकांना अनुदानावर वर्षाला १२ सिलिंडर मिळायचे. कोरोना महामारीनंतर स्वयंपाकाच्या गॅसवर दिले जाणारे अनुदान कमी होऊ लागले. यापूर्वी सरकारने स्वेच्छेने अनुदान सोडावे यासाठी मोहीम सुरू केली होती. तथापि, महामारीच्या काळात, सर्वांसाठी अनुदान संपले. आता उज्ज्वला योजनेंतर्गत कनेक्शन घेणाऱ्यांनाच एलपीजी सिलिंडर सबसिडी दिली जाते.

