दंतेवाडा : छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी जिल्हा राखीव रक्षक (DRG) दलाच्या जवानांवर हल्ला केला. नक्षलवाद्यांनी DRG दलाच्या वाहनावर आयईडी हल्ला केला. या हल्ल्यात 11 जवान शहीद झाले आहेत. त्यामध्ये 10 डीआरजी कर्मचारी आणि एक चालक आहे. नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या मधोमध भूसुरुंग टाकली होती. हा आयईडी स्फोट इतका भीषण होता की रस्त्यावर अनेक फूट खोल खड्डा तयार झाला आहे. दरम्यान, पोलीस आणि नक्षलवाल्यांमध्ये चकमक अजूनही सुरूच आहे. आणखी फोर्स मागवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
बस्तरचे आयजी सुंदरराज यांनी सांगितले की, नक्षलवाद्यांनी अरणपूरच्या पालनार भागात जवानांना लक्ष्य केले. सध्या शोध मोहीम सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीआरजी जवान काल ऑपरेशनवर गेले होते. परतत असताना नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला.
मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात हेड कॉन्स्टेबल जोगा सोधी, मुन्ना राम कडती, संतोष तामो, नवीन हवालदार दुल्गो मांडवी, लखमू मरकाम, जोगा कावासी, हरिराम मांडवी, गुप्त सैनिक राजू राम कर्ताम, जयराम पोडियम, जगदीश कावासी हे शहीद झाले. त्याचवेळी या हल्ल्यात खासगी वाहनाचा चालक धनीराम यादव यांनाही जीव गमवावा लागला.
गेल्या अनेक वर्षांत नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्यात डीआरजीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याशिवाय अनेक माजी नक्षलवादी नेते आता छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात डीआरजीमध्ये काम करत आहेत.
DRG ची स्थापना 2008 मध्ये झाली
राज्यातील नक्षलवाद्यांना कमकुवत करण्यासाठी 2008 मध्ये डीआरजीची स्थापना करण्यात आली होती. ही फौज प्रथम कांकेर आणि नारायणपूर येथे तैनात करण्यात आली. त्यानंतर 2013 मध्ये विजापूर आणि बस्तर, त्यानंतर 2014 मध्ये सुकमा आणि कोंडागाव आणि त्यानंतर 2015 मध्ये दंतेवाडा येथे त्यांची नियुक्ती झाली.