मुंबई : सत्तासंघर्षानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रथमच मालेगावात येत आहे. आज त्यांची मालेगावातील एमएसजी महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी 5 वाजता सभा होणार असून यासाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले.
मंत्री दादा भुसे यांच्या मतदार संघात ही सभा होत असल्याने उद्धव ठाकरे यांची तोफ त्यांच्यासह कोणावर धडाडणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या सभेविषयी बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची पुन्हा जीभ घसरली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
या सभेविषयी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मालेगावच्या सभेकडे संपूर्ण राज्याचे नाहीतर देशाचे लक्ष लागले आहे. मला आताच दिल्लीच्या काही नेत्यांचे फोन आले. सगळीकडे सभेची चर्चा आहे. देशात आणि महाराष्ट्रात जे सुरु आहे त्यावर उद्धव साहेब काय बोलतील याकडे सर्वांच लक्ष आहे.
संजय राऊत म्हणाले, स्वतः मी आणि विनायक राऊतसाहेब या सभेचे काम पाहत आहोत. रेकॉर्ड ब्रेक शब्द हा कमी पडेल अशी सभा होईल आणि इथे भाड्याने कोणी येणार नाही. दीडशे रुपये भाड्याने देऊन कोणी येणार नाही. असे लोक येतात आणि समोर प्रमुख भाषणं सुरू झाली की निघून जातात. या सबेसाठी काही संस्थानी सुट्या दिल्या आहेत असे देखील राऊत यांनी सांगितले.
‘उर्दू ही भाषा देशात नाही का?’
मालेगावात उद्धव ठाकरे यांचे उर्दू भाषेतील पोस्टरवर बोलताना राऊत म्हणाले, देशात उर्दू भाषा नाही का? त्यांनी जावेद अख्तर यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन केलेल्या वक्तव्याचे देखील कौतूक केले. भाषेच्या संदर्भात चित्त विचलित करू नका, लोकांचं लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. माझ्या भाषेत सांगायचं झालं तर या सभेमुळे लोकांची हात भर…. अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे.