मुंबई: एकीकडे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळवरून केलेल्या वक्तव्याने अडचणीत आले असून त्यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे.
कारण कसबा पोटनिवडणूकीच्या प्रचारादरम्यान फडणवीसांनी प्रचार करताना आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. रवींद्र धंगेकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत प्रचारात धर्माचा वापर करून समाजात दुही माजवण्याचा देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केल्याचे नमूद केले आहे.
नुकताच कसबा-चिंचवड पोटनिवडणूकीच्या प्रचाराचा धुराळा पाहायला मिळाला. आज या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जात आहे. या निवडणुकीत भाजपसह महाविकासआघाडीच्या नेत्यांनी आपल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार केला. निवडणूकीत आपल्याच उमेदवाराचा विजय व्हावा यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी मोठमोठ्या सभा देखील घेतल्या.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारादरम्यान कसबा पेठ मतदार संघ हिंदुत्ववादी आहे. त्याच वेळी पुण्येश्वर मंदिराचाही उल्लेख करत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने पुण्येश्वर मंदिराच्या बाबत भूमिका स्पष्ट करावी असं म्हंटलं होतं. याच विधानाचा आधार घेत रवींद्र धंगेकर यांनी तक्रार केली आहे.